
मनसेच्या माजी नेत्याचे महत्त्वाचे विधान !
महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जवळ येताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
त्यानंतर आज (मंगळवारी) राज ठाकरे हे शिवसेना, काँग्रेस आणि मविआच्या नेत्यांसह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवडणुकीत पारदर्शकता असावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मात्र या भेटीमुळे राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेतनंतर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, काँग्रेस बरोबर घ्यावे असे राज ठाकरेंना वाटते. या विधानानंतर राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला बरोबर घ्यावे, अशी राज ठाकरेंची इच्छा आहे. मात्र याचा अर्थ यावर निर्णय झाला असे नाही. या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. शिवसेना, मनसे, शरद पवार, डावे आणि काँग्रेसचेही स्थान आहे.
मात्र संजय राऊत यांच्या विधानावर वाद उद्भवल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. माझे विधान निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी असलेल्या शिष्टमंडळात मविआमधील काँग्रेसचाही समावेश असावा, असे राज ठाकरे म्हणाल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे काँग्रेसबरोबर गेले तर…
दरम्यान या घडामोडींवर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “शरद पवार किंवा उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाकडे गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. पण राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे जात आहेत, याचे आश्चर्य वाटते. राज ठाकरे हे शरीराने महाविकास आघाडीकडे गेल्याचे दिसत आहे. मनाने त्यांचा ओढा कुठे आहे? हे सर्व जगाला माहीतच आहे. राज ठाकरे जर काँग्रेसबरोबर गेले तर मला नक्कीच वाईट वाटेल.”
प्रकाश महाजन पुढे म्हणाले, पक्षात असताना राज ठाकरेंनी माझा सल्ला कधी विचारला नव्हता. आता तर मी पक्षातून बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे आता ते माझा सल्ला घेतील की नाही? हे माहीत नाही.
राज ठाकरेंची हिंदुत्व आणि मराठी माणसांविषयी ज्या कल्पना आहेत. त्याला काँग्रेसमध्ये फार वाव नाही, असे मला वाटते. पण काँग्रेसबरोबर जावे की नाही, हा राज ठाकरेंचा निर्णय आहे. काँग्रेसबरोबर तसे उद्धव ठाकरेंही गेले. त्याचे मला वाईट वाटले नाही. पण राज ठाकरे काँग्रेसबरोबर जाणार असतील तर मला नक्कीच त्याचे वाईट वाटेल, असेही प्रकाश महाजन म्हणाले.