
वीजयसिंह मोहिते पाटील पुन्हा भाजप नेत्यांसोबत व्यासपीठावर:दीड वर्षानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्रीपूर येथे एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या भाजपबरोबरच्या पॅचअपची चर्चा रंगली आहे.
सुधाकर परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शक्तिप्रदर्शन :
श्री पांडुरंग साखर कारखान्यातील कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पुढाकाराने अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रित केले आहे.
बावनकुळे-फडणवीस वचनप्रकरण चर्चेत :
प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बावनकुळे यांनी त्यांना लवकरच विधिमंडळात संधी मिळेल असा शब्द दिला होता; आता फडणवीस याबाबत काय बोलतात, याकडे लक्ष आहे.
Solapur, 14 October : लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षापासून दुरावलेले माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे तब्बल दीड वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपबरोबर पॅचअप केली काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर दूर गेलेले विजयदादा हे प्रथमच भाजप नेत्यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत.
श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणाचे उद्घाटनही उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी सुधाकरपंत परिचारक यांचे सहकारी आणि त्यांच्या वारसांना निमंत्रित केले आहे.
यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, प्रणिती शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यापासून अनेक आजी-माजी आमदारांना कार्यक्रमाला आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
बावनकुळेंनी दिलेल्या शब्दावर फडणवीस बोलणार?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यांच्या समर्थकांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मात्र, एक एक जागा महत्त्वाची असल्याने त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना परिचारक यांची समजूत काढण्यासाठी पंढरपूरला पाठवले होते.
तब्बल दीड ते दोन तास चर्चा केल्यानंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा प्रशांत परिचारक यांनी केली होती. त्याचवेळी बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक हे लवकरच विधिमंडळात दिसतील, असा शब्द जाहीरपणे दिला होता. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणते भाष्य करतात, याकडे परिचारक समर्थकांचे लक्ष असणार आहे.
भाजपबरोबर मोहिते पाटलांचे पॅचअप?
लोकसभेला माढ्यातून तिकिट नाकारल्यानंतर ढासळलेल्या गडाला मजबुती आणण्यासाठी धैर्यशील माेहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीच्या वेळी विजयदादांसह अनेकांनी घरवापसी केली होती. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत कायम होते.
मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर अनेकदा प्रहार करण्यात आले. मात्र, त्यांनी भाजपविरोधात किंवा टीका करणाऱ्यांवर दुर्लक्ष करत पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या या कार्यक्रमाला आता विजयदादांसह, खासदार धैर्यशील, रणजितदादा आदींची उपस्थिती असणार आहे, त्यामुळे मोहिते पाटलांनी भाजपसोबत पॅचअप केले की काय? अशी चर्चा रंगली आहे.
1. विजयसिंह मोहिते पाटील कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत?
श्रीपूर येथील सुधाकर परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात.
2. या कार्यक्रमाला कोणते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत?
देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील आदी नेते.
3. बावनकुळे यांनी कोणता शब्द दिला होता?
प्रशांत परिचारक यांना लवकरच विधिमंडळात संधी मिळेल, असा शब्द त्यांनी दिला होता.
4. मोहिते पाटलांनी भाजपबरोबर पॅचअप केले का?
कार्यक्रमात त्यांची उपस्थिती पाहता, त्यांच्या भाजपसोबत पुनर्मिलनाच्या चर्चेला जोर आला आहे.