
मंत्री सरनाईकांनी असा उधळला !
एसटी महामंडळाची कोट्यवधीची जमीन, तिच्यावर लँडमाफियांचा डोळा, जमीन बळकवण्याच्या दिशेनं चक्र देखील फिरली. महसूल विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीशी निगडीत कागदपत्र देखील फिरली.
जवळपास ताबा मारण्याचं निश्चित झालं.
पण हा सर्व प्लॅन काँग्रेसचे श्रीरामपूर हेमंत ओगले यांनी हेरला अन् थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक लावली. मंत्री सरनाईक यांनी देखील याची गंभीर दखल घेत, थेट आदेश काढत, जमिनीशी संबंधित निगडीत सर्व कार्यवाही विनाअडथळा पूर्ण करत, 7/12 आणि 8 (अ) उताऱ्यांवरील शासन नोंदी पूर्ण करण्याचा आदेश काढला.
मंत्री सरनाईक यांनी श्रीरामपूरमधील (Shrirampur) एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीला गती दिली. इथली जमीन सरकारची स्पष्ट असल्याचे करत, बसस्थानकाचे काम 1 नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचा आदेश दिला. जमिनीवर शासनाची नोंद पूर्ण करण्याचा निर्देश दिले. या बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभाग नियंत्रक, जिल्हा भूमिलेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आणि कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
काँग्रेस(Congress) आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत, तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देत, तातडीने बैठकीची मागणी केली. त्यानुसार मंत्रालयातील दालनात मंत्री सरनाईक यांनी बैठक घेतली.
आमदार ओगले यांनी या बैठकीत, बसस्थानकाचे काम मंजूर असून काही प्रशासकीय व उताऱ्यांतील तांत्रिक अडचणींमुळे काम रखडल्याकडे लक्ष वेधले. त्याचा गैरफायदा घेत काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या गुंडांना राजकीय पाठबळ मिळत असल्याकडे देखील लक्ष वेधले. महसूल विभागाशी निगडीत असलेल्या दुय्यम निंबधक कार्यालयात तशी कागदपत्रे देखील फिरली.
बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ
मंत्री सरनाईक यांना वरील प्रकाराचं गांभीर्य लक्षात आले. मंत्री सरनाईक यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमिलेख अधिकाऱ्यांना जागेशी संबंधित उताऱ्यांवर शासनाच्या नोंदी तातडीने करण्याचा आदेश दिला. तसंच 1 नोव्हेंबरपर्यंत बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
पोलिस अधीक्षकांना कारवाईचा आदेश
बसस्थानकाच्या कामाला आणि एसटी महामंडळाच्या जमिनीची शासकीय नोंद घेण्यात कोणी अडथळा आणल्यास त्वरीत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हा पोलिस अधीक्षकांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. आमदार ओगले यांच्या सतर्कतेमुळे शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न हाणून पडला, तर मंत्री सरनाईक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एसटी महामंडळाची कोट्यवधीची जमिनीची सरकार दरबारी नोंद होणार आहे.
जमीन बळवण्यासाठी राजकीय बळ
एसटी महामंडळाच्या ही जमीन श्रीरामपूर शहरात मध्यवर्ती भागात आहे. या जमिनीची बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांचं आहे. ही जमिनीवर काही गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींना ताबा मिळवण्यासाठी महसूल विभागात फिल्डिंग लावली होती. काही विभागात कागदपत्र देखील फिरली होती. यासाठी राजकीय बळ मिळाल्याची चर्चा आहे.