
भाजप आमदार पडळकर पुन्हा बरळले !
आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून कायम चर्चेत राहणारे गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
यावेळी हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘जिम ट्रेनरकडून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यामुळे हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये’. असा अजब सल्ला पडळकरांनी हिंदू मुली आणि तरूणींना दिला आहे. ‘हिंदू मुलींनी जिममध्ये न जाता, घरीच योगा करावा’, असं देखील पडळकर म्हणाले. त्यांच्या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
गोपीचंद पडळकर बीड दौऱ्यावर होते. सभेदरम्यान बोलताना पडळकर म्हणाले, ‘खास हिंदू मुलींना माझी विनंती आगे. जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे, हे माहित नाही. अशा जिममध्ये हिंदू मुलींना जाणं टाळावं. घरी योग्य करणे अधिक योग्य ठरेल. हे किती मोठं षड्यंत्र आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही, कळणारही नाही. हिंदू मुलींनी घरातच व्यायाम किंवा योगा करावा. तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही’, असे पडळकर म्हणाले.
तसेच, भाषणेवेळी पुढे बोलताना पडळकरांनी पुढे म्हटले की, ‘ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या तरूणांची ओळख पटवून त्यांना थांबवायला हवं. यासाठी एक सक्षम प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कपाळावरही लिहावं लागेल अहिल्यानगर
पत्रकार परिषदेत बोलताना पडळकर म्हणाले, ‘हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारंआहे. विरोधक लहान मुलांसारखं रडल्यासारखं आव आणतात. तुम्ही कायद्याच्या देशात राहत आहात. मग अहिल्यानगर असं म्हणण्यात काय गैर आहे? कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहावं लागेल. मुलांच्या दाखल्यांवरही हे नाव येणार आहे’, असं पडळकर म्हणाले.
‘मुघल औरंगजेब यांसारखी नावं पुसली पाहिजेत. बीड जिल्ह्यात जहांगीर मोहा नावाचं गाव आहे. त्याचं नावही बदललं पाहिजे. अशा गावांची नावं मुघलांच्या वारसांवरून ठेवलेली आहेत. ती मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आम्ही गावांची नावं बदलून टाकू’, असं पडळकरांनी स्पष्ट केलं.