
अन् गुलाबरावांनी टायमिंग साधले; भाजपही धावली मदतीला !
केळी उत्पादक शेतकरी आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर माजी खासदार उन्मेश महाजन आक्रमक आहेत. त्यांनी नुकताच शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा मागण्या ऐवजी वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
केळी उत्पादकांना यंदा विम्याची मदत उशिरा मिळाली. जिल्ह्याचे राजकारण केळी उत्पादक शेतकऱ्यांची निगडित आहे. यानिमित्ताने केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केला.
मात्र यावेळी अधिकाऱ्यांची चर्चा करताना माजी खासदार पाटील यांची जीभ घसरली. भाजपने या कारणावरून त्यांना घेरले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ही संधी साधक त्यांच्यावर कारवाईची सूचक मागणी केली.
या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी खासदार पाटील यांचे कान टोचले आहेत. माजी खासदार उमेश पाटील हे शिक्षित आहेत. इंजिनीयर आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यात आपली एक प्रतिमा निर्माण केली आहे.
मात्र आपण शिक्षित असल्याने कोणती भाषा वापरावी याचे बंधन आहे. महिल तसेच आमदार आणि खासदार यांच्या विषयी उन्मेश पाटील यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे. अशी भाषा कोणीही सहन करू शकणार नाही. याची किंमत त्यांना मोजावी लागेल.
आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणत्याही आंदोलनाला आमचा विरोध नाही. प्रत्येकाला आंदोलनाचे स्वातंत्र्य आहे. मात्र अशा मोर्चात महिलांविषयी कोणती भाषा वापरली जाते याला तारतम्य आहे. उन्मेश पाटील यांनी ही पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून याची दखल घेतली पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.
उन्मेष पाटील यांनी केळी उत्पादक, पिक विमा आणि कर्जमुक्ती या प्रश्नावर भाजपला घेरले आहे. त्यामुळे भाजपने देखील या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. उन्मेष पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन त्यांनी केले. अमळनेर येथील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अध्यक्ष योगेश महाजन यांनी पाटील यांना अमळनेर शहरात पाय ठेवून दाखवावा असे आव्हान दिले आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेला उन्मेष पाटील यांनी संधी दिली आहे. पुरेपूर लाभ पाटील यांच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपने करून घेतला. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उतरले आहेत.