
जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याने राज्यातील राजकारण तापलंय.
अनेक तालुक्यांमध्ये पक्ष फोडीचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचं पारडंही हळूहळू जड होत असल्याचं चित्र आहे. जालना जिल्ह्यातील मोठे व्यक्ती आणि संस्थाचालक पी.एन यादव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती आणि संस्थाचालक पी.एन यादव यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात यादव यांनी शिवबंधन हाती बांधून घेतलं. तसेच ठाकरेंच्या नेतृत्वखाली पक्षाला साथ देत असल्याचं जाहीर केलं.
या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी काही कार्यकर्तेही उपस्थितीत होते. शिवसैनिकांनी पी.एन यादव यांचं ठाकरे गटात स्वागत केलं. यादव यांचं शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाल्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.
यापक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करणार असल्याचं सांगितलं. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कायम सोबत आहे. दिवाळीनंतर शिवसेनेकडून मराठावाडा दौरा करण्यात येईल. दिवाळी आधी सरकारने शेतकऱ्यांना मदत करायला हवी. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत सरकारला सोडायचं नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.