
अजितदादांच्या चालीने भाजपही टेन्शनमध्ये…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. तीन वेळा आमदार राहिलेल्या आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर यांनी तडकाफडकी राजीनामा सादर केला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. खेडकर यांनी मात्र आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारे कळविले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष खेडेकरांच्या राजीनाम्यामुळे बुलडाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुलडाणा, हिंगोली आणि अहमदनगर जिल्ह्यातील तीन जिल्हाध्यक्षांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने पवार गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रेखा खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी राजीनामा देऊन अजित पवार गटात जाणार असल्याचे चर्चेचे आता उधाण आले.
खेडकर यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. रेखाताई खेडेकर यांनी मागील तीन वर्षांपासून बुलडाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघत आहे. त्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्यावेळी त्यात भाजपातून निवडून आल्या होत्या. अडीच वर्ष महायुतीची सत्ता असताना बुलडाण्याचे आमदार व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे अजित दादांच्या गटात सहभागी झाले होते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल बघून ते विधानसभेच्या निवडणुकीत परत शरद पवार गटात सहभागी झाले होते. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या गटातून शिंगणे यांच्या पुतणीला विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार करण्यात आले होते.
रेखा खेडकर 1995, 1999 आणि 2007 अशा तीन टर्म निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्या भाजपमध्ये होत्या. त्यानंतर सलग 10 वर्षे काँग्रेसचे राहूल बोंद्रे निवडून आले. सध्या भाजपच्या श्वेता महाले या चिखलीच्या आमदार आहेत.