
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. यानंतर शनिवार वाड्याजवळ प्रतिकात्मक आंदोलन देखील केले. या आंदोलनानंतर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला.
शनिवारवाड्याच्या आतील बाजूस काही व्यक्ती नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी समाज माध्यमावर टाकला होता. या व्हिडिओच्या आधारे शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे, असे मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) म्हणाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी शनिवार वाडा परिसरात जमण्याचे आवाहन केले आणि त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक आंदोलन देखील केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी शनिवार वाडा परिसरात असलेल्या मजारीवर भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली.
यादरम्यान माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणल्या, ‘याबाबत आम्ही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी ही घटना घडल्याचे कबूल केले असून तातडीने या लोकांना बाहेर काढण्यास सांगितले. एखाद्या शुक्रवारी ही घटना घडल्या असल्याचे देखील त्यांच्याकडून कळवण्यात आले आहे. ही घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा होत होता. तो करण्यास नकार दिला जातो. मात्र, नमाज पठण कसे करू दिले जाते, असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व राड्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या मैदानात उतरल्या असून त्यांनी कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे. रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, पुण्यात भाजपने खासदार मेधाताई कुलकर्णी यांना आवर घालावी. शनिवारवाडा हा कोणाच्या बापाचा नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशव्यांचा आहे. पुणेकरांचा सर्व जाती धर्मांचा आहे. पुण्यातील हिंदू-मुस्लिम समाजातील वातावरण त्या खराब करत आहेत, जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. त्या खासदार असल्याचे विसरले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कोथरूडमध्ये झाली नाटके आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावरच तातडीने गुन्हा दाखल करा. खासदार ताईला प्रार्थना असो की दुवा करणे असो एकच आहे, हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक करत आहेत, अशी टीका यावेळी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.