
४६ वर्षांपूर्वीची एक घटना आठवते?- पाकिस्तानमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. २१ नोव्हेंबर १९७९. जमात-ए- इस्लामीशी संबंधित संतप्त जमावाने इस्लामाबादमधील अमेरिकेच्या दूतावासाला आग लावली.
गेल्या आठवड्यात तहरीक-ए-लब्बैक नावाच्या जहाल धार्मिक संघटनेने असेच काही करायचे ठरवले होते. परंतु, सैन्याने गोळ्यांचा वर्षाव केला आणि तहरीक-ए-लब्बैकचा जत्था इस्लामाबादपर्यंत पोहचू शकला नाही.
१९७९ मध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला होण्यामागे इराणचे धार्मिक नेते आयातोल्ला खोमेनी होते. त्यांनी इराणी रेडिओवर खोटेच सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलने सौदी अरबस्तानात मोठ्या मशिदीवर कब्जा करण्याचा कट रचला आहे. ही तद्दन खोटी बातमी पसरताच पाकिस्तानमध्ये आग भडकली. इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये दंगे झाले, अमेरिकेच्या अनेक कार्यालयांना आगी लावल्या गेल्या. अमेरिकेने झिया-उल- हक यांना धमकावल्यावर दंगलींवर नियंत्रण मिळवले गेले. परंतु तोपर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन अमेरिकन नागरिक होते.
यावेळी असे काही खोटे पसरविण्यात आले नाही. परंतु पाकिस्तानच्या लोकांना असे वाटत होते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुशामतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख मुनीर यांनी सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. शरीफ आणि मुनीर यांची जोडी इस्रायलविषयी मवाळ भूमिका घेत असून, पॅलेस्टिनींना धोका देत आहे. ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जो समझौता तयार केला त्यात इस्रायलचा फायदा होणार आणि पॅलेस्टिनींच्या हातात काही लागणार नाही. असे असताना पाकिस्तान ट्रम्प यांच्या बरोबर का उभा आहे, अशी त्या देशातली जनभावना आहे.
त्यावरून पाकिस्तानच्या तहरीक-ए-लब्बैक या संघटनेने लाहोरमध्ये गोंधळ घातला. संघटनेचे हजारो समर्थक इस्लामाबादमध्ये अमेरिकन दूतावासाला घेरण्यासाठी बाहेर पडले. सीआयएच्या हे लक्षात येताच अमेरिकेने पाकिस्तानला दरडावले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने बळाचा वापर केला. तहरीकच्या दाव्यानुसार संघटनेचा नेता साद हसन रिझवी याला गोळी लागली असून, २५० कार्यकर्ते मारले गेले आहेत. १५०० जण जखमी झाले आहेत. हे साद रिझवी खादिम रिझवी यांचे पुत्र असून, त्यांनी २०१५ मध्ये तहरीक-ए-लब्बैकची स्थापना केली. यामागेही पाकिस्तानी सैन्यच होते. तूर्तास एवढी मोठी घटना होऊनही पाकिस्तानी माध्यमांमध्ये कोठे बातम्या आल्या नाहीत. कारण, सैन्याने सगळ्यांना गप्प केले आहे.
ट्रम्प यांची भलामण करण्यात मुनीर आणि शरीफ आंधळे झाल्याचे मत पाकिस्तानात पसरले आहे. शरीफ आणि मुनीर यांच्याविरुद्धचा हा राग अत्यंत गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असेही जाणकार सांगतात. पाकिस्तानात जहालांचे समांतर सरकार चालते. सरकारसुद्धा त्यांच्याशी वाकडेपणा घ्यायला घाबरते. तहरीक-ए-लब्बैकवर पाकिस्तानी सैन्याने कारवाई केल्यामुळे दुसऱ्या जहालवाद्यांचे रक्त उसळले आहे. त्यांना असे वाटते की, सरकार आणि सैन्य जर अमेरिकेच्या कह्यात गेले असेल तर त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागेल.
यावेळी आणखी एका कारणाने पाकिस्तानी जनतेचा राग वाढतो आहे; ते कारण म्हणजे तालिबानबरोबर पाकिस्तानची लढाई. गतसप्ताहात कोणतेही कारण नसताना पाक सैन्याने ज्याप्रकारे तालिबानवर हवाई हल्ले केले ते लोकांना पटलेले नाही. हे ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर झाले असे त्यांना वाटते. अफगाणिस्तानने आपला बगराम हवाईतळ अमेरिकेच्या ताब्यात द्यावा, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी एक अत्यंत फालतू कारण पुढे केले. त्यांचे म्हणणे, बगराम हवाईतळ अमेरिकेने बांधला होता म्हणून त्यावर अमेरिकेचा हक्क आहे. ट्रम्प यांच्या प्रयत्नांच्या विरोधात चीन, रशिया आणि भारत तालिबानच्या बरोबर उभे आहेत. ट्रम्प त्यांच्या फायद्यासाठी आपला उपयोग करत आहेत, असे पाकिस्तानी जनतेला वाटते. यातून चीनबरोबरची मैत्रीही संकटात येऊ शकते.
राज्यकर्ते आणि आपल्या सैन्याबद्दल पाकिस्तानी जनतेला जे वाटते आहे ते खरे आहे काय? दिसते तर तसेच आहे. ज्याप्रकारे ट्रम्प यांची चंपी मालीश झाली त्यामागे काही ना काही फायद्याचा विचारच असणार. परंतु, त्यात पाकिस्तानचे भले होण्यापेक्षा सैन्याचे अधिकारी आणि नेत्यांचा लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. तेथील सत्ता कधी सामान्य जनतेचा विचार करत नाही आणि सामान्य पाकिस्तानी माणसाला रोजच्या भाजी-भाकरीचीच चिंता मोठी आहे. त्यात पाकिस्तानी जनतेला धर्माच्या धुंदीत इतके बुडवले गेले आहे की, त्यांनी जास्त काही विचार करूच नये. नागरिक विचार करायला लागले, तर सत्ता टिकणार कशी? धर्माच्या चादरीत लपेटले गेले नाहीत, तर धर्मयुद्धाच्या नावावर तरुण भडकतील कसे? परंतु यावेळी पाकिस्तान स्वतःच कचाट्यात सापडला आहे. जे साप त्याने पाळले तेच त्याला आता डंख मारू लागले आहेत.
पाकिस्तान ट्रम्प तात्यांच्या नादी लागला आहे; पण त्यात तात्यांचा तरी काय दोष? ऊठसूट सगळ्यांना भडकावत सुटणे हेच तर तात्यांचे काम; आणि पाकिस्तान तरी वेगळे काय करतो? हा देश एखाद्या दिवशी ट्रम्प तात्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायला कमी करणार नाही… आणि लादेन पाकिस्तानच्याच अंगणात राहात होता हे तात्या तरी कसे विसरतील? तात्या हे जाणतात की पाकिस्तानी सैन्य, त्यांची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि त्यांच्या इशाऱ्यांवर चालणारे शासन; त्यांना जिथून कुठून मालमत्ता मिळण्याची थोडीशीही आशा असते, तिथे ते कोणत्याही पातळीवर वाकायला तयार असतात. आणि तात्या याच गोष्टीचा फायदा घेत आहेत !