लष्करी कमांडर परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन !
जैसलमेर: ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या धैर्याचे आणि संयमाचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदवले जाईल, असे सांगतानाच, शत्रूंना कधीही कमी लेखू नका आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सतर्क राहा, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लष्कराला केले
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानच्या जैसलमेर येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळ भारतीय लष्कराच्या ‘थार शक्ती’ या युद्धसरावाची पाहणी करीत लष्कराचे शौर्य, लढाऊ बाणा आणि वाळवंटातील युद्धसज्जतेचे कौतुक केले. दोन दिवसांच्या जैसलमेर दौऱ्यावर आलेले राजनाथ सिंह यांनी कमांडर परिषदेत भारतीय सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित केले. भविष्यातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी माहितीयुद्ध, आधुनिक संरक्षण पायाभूत सुविधा विकसित करणे व आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना केले.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताच्या लष्कराचा पराक्रम आणि राष्ट्रीय चारित्र्य यांचे मूर्त रूप होते, या शब्दांत राजनाथ यांनी या लष्करी मोहिमेचा गौरव केला. ‘जवानांचे सामर्थ्य केवळ शस्त्रांमध्येच नाही, तर त्यांची नैतिक शिस्त व धोरणात्मक स्पष्टतेमध्येही आहे, हे या ऑपरेशनने दाखवून दिले आहे. दहशतवाद्यांविरुद्ध सैन्याने केलेली कारवाई धोरणात्मक अचूकता आणि मानवी प्रतिष्ठा या दोन्हींनुसार होती. जोपर्यंत दहशतवादी मानसिकता जिवंत आहे तोपर्यंत शांततेसाठीची आमची मोहीम सुरू राहील,’ असे संरक्षणमंत्री म्हणाले.
वाळवंटात प्रगत युद्धकौशल्यांचे दर्शन
जैसलमेर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राजस्थानच्या जैसलमेर येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळ लौंगेवाला सीमा चौकी येथे भारतीय लष्कराच्या थार शक्ती सरावाचा आढावा घेतला. त्यावेळी शेकडो सैनिकांनी वाळवंटी प्रदेशात प्रगत युद्धकौशल्यांचे दर्शन घडवले. रोबोटिक खेचर, ड्रोन, रोबो श्वान, एटोर १२०० वाहने, रणगाडे आणि हेलिकॉप्टर अशा अत्याधुनिक तंत्रसज्ज साधनांचा या सरावात समावेश होता. सरावादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी जवानांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.


