रामराजे नाईक निंबाळकरांनी केली ही मागणी…
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. मृत डॉक्टरच्या हातावर एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये तिने एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या घटनेने संपूर्ण राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणावरून विधानपरिषदेचे माजी सभापती आणि फलटणचे माजी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे फलटणची बदनामी झाली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “या घटनेने फलटणची बदनामी झाली आहे. का झाली आहे हे सर्वांना माहीत आहे. CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या तपासाबाबत माझा विश्वास आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. “मी या घडलेल्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करतो. पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटता आले असते तर बरे झाले असते. मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. या आधी फलटण तालुक्यात सरकारी लोक आवर्जून बदली मागायचे,” असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात एक तरुणी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. पण गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री या महिला डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये जाऊन गळफास घेतला आणि आपल्या जीवनाचा शेवट केला. धक्कादायक म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात तिने नमूद केले की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.” दरम्यान, पोलीस अधिकारी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर बलात्कार तसेच, आत्महत्येस प्रवृत्त करणे या प्रकारचा गुन्हा फलटण पोलिसांकडून दाखल करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिली. फरार असलेल्या आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरु आहे. मृत डॉक्टर महिलेचे शेवटचे बोलणे हे आरोपी प्रशांत बनकर यांच्याशी झाले होते. त्यांचा डॉक्टरची खूप वेळाचे फोन झाले आहेत. याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे असे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सांगितले.


