फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याआधी तिच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते.
ज्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अशी दोन नावे समोर आली आहेत. या प्रकरणातील आरोपी बनकर याला शनिवारी (ता. 25 ऑक्टोबर) पोलिसांनी अटक केली. पण या घटनेनंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी तर या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपाचे नेते तथा माढाचे माजी खासदार निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, डॉक्टर महिलेने 19-6-2025 ला एक पत्र पोलीस उपअधिक्षकांना लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी त्यांचे अधिकारी कशा प्रकारे गैरवर्तन करतात याची माहिती दिली होती. त्यानंतर तिने या प्रकरणी काय कारवाई झाली, याची माहिती घेण्यासाठी 13-8-2025 ला माहितीच्या अधिकारामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी यांना पत्र लिहिले. त्यानंतर पुर्ण माहिती असलेले 4 पानांचे पत्र स्वतः लिहिले. या सर्व प्रकरणात त्यांनी सुस्पष्ट भूमिका मांडली. यामध्ये तिने स्थानिक राजकीय नेते ज्यांचे मी काल रात्री नाव घेतले नव्हते, ते म्हणजे भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या स्वीय्य सहाय्यकांचा उल्लेख केल्याची माहिती दानवेंनी दिली.
निंबाळकरांचे राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे पीए आहेत. यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी महिला डॉक्टरशी बोलले होते. ते नेमके कशासाठी बोलले तर एका बीडमधील वाहतूकदाराच्या फिट अनफिट रिपोर्टबाबत त्यांचे बोलणे झाले आणि त्यानंतर याच दबावातून तरुणीने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. हा सगळा प्रकार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे, त्यांचे खात्याचे लोक कशाप्रकारे डॉक्टरांशी वागतात, हे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये सत्तेचा माज दिसतो. आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी प्रामाणिकपणे आपले काम करत होती, असे यावेळी दानवेंनी सांगितले.
तर, डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील अधिकारी चौकशीसाठी नको. महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करा. तसेच महाडिक नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करा. काही दिवसांपूर्वी महाडिक हा अधिकारी प्रमोशन होऊन डीवायएसपी म्हणून नंदूरबारला गेला. महाडिक हा अधिकारी माजी खासदारांचा दलाल होता, असे आरोपही यावेळी अंबादास दानवे यांनी केले आहेत. तसेच, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी हा प्रकार करणे चूक आहे. ही भाजपाची सत्तेची मस्ती आहे, असा हल्लाबोलही यावेळी दानवेंनी केला.
माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ अभिजीत नाईक निंबाळकर हे 24 तास तहसीलदार, प्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत असतात. याने शेतकऱ्यांच्या खात्यावर गैर उत्खनन केले म्हणून याने 1 कोटी रुपये पर्यंत बोजा चढवला आहे. वाठार निंबाळकर आणि वाखरी या गावातील शेतकरी आहेत यांच्यावर 1 कोटी रुपयांचा गैर उत्खनन प्रकरणी बोजा चढवला आहे. अभिजीत निंबाळकर याने हा खोटा प्रकार केला आहे. सत्तेचा माज दाखवून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अशाप्रकारे नामोहरम केले जात आहे, असा गंभीर आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला आहे.


