भाऊबीजेलाच बहीण-भावामध्ये बिनसलं !
बिग बॉस मराठी 5 या पर्वातून अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार ही बहीण-भावाची जोडी घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे रील्सही व्हायरल झाले आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करायच्या आधीपासून धनंजय आणि अंकिता एकमेकांना ओळखत होते आणि या घरात आल्यानंतर त्यांच्यातील हा बॉन्ड अधिकच खास झाला होता.
या खेळानंतरही त्यांच्यातील बॉन्डिंग पाहायला मिळाले. मात्र, अलिकडेच भाऊबीजेदिवशी या नात्यात कटुता आल्याचे चित्र निर्माण झाले. दोघांनीही एकमेकांविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. डीपीने तर अंकिताची माफीही मागितली आहे.
नेमकं काय घडलं?
कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिताने तिच्या काही भावंडांसोबतचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. भाऊबीजेनिमित्ताने तिने या पोस्ट शेअर केल्या होत्या. यादरम्यान तिने शेअर केलेल्याएका स्टोरीमध्ये डीपीविषयी असे लिहिले की, ‘धनंजय पोवार या भावाने मला भाऊबीजेच्या शुभेच्छादेखील दिल्या नाहीत. भाऊबीजेला भावाने बहिणीडे यायचं असतं, पण यायला नाही जमलं तर एक कॉल तरी?’ अंकिताने या पोस्टमध्ये डीपीला टॅग केले आहे, शिवाय ‘कभी खुशी कभी गम’ हे भावुक करणारे गाणेही बॅकग्राउंडसाठी वापरले.
अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टला डीपीनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करतच उत्तर दिले. त्याने तिची स्टोरी रिपोस्ट करत म्हटले की, ‘भाऊ दिवाळीच्या व्यापारात व्यस्त होता, वाटले होते की बहिणीने समजून घेतले असेल. पण आता हीच माझी एक चूक समजून तुला एक लवकरच गिफ्ट नक्की देईन, जे तुला आवडेल.’ डीपीने अंकितासोबतचा एक फोटो शेअर करत असेही म्हटले की, ‘विसरलो नक्कीच नाही, तरी चुकलो असेन तर माफ कर.’
धनंजय आणि अंकितामध्ये यावरुन खरोखरच वाद झाला आहे की, इन्स्टाग्रामवर त्यांच्यामध्ये केवळ मस्करी सुरू आहे हे या पोस्टमधून स्पष्ट झालेले नाही. अंकिताने पुन्हा एकदा डीपीने शेअर केलेली पोस्ट रिपोस्ट केली, मात्र त्यांच्यातील अबोला दूर झाला का, हे यातून स्पष्ट झालेलं नाही.


