अंबादास दानवेंचे फडणवीसांना ८ सवाल; फलटणच्या घटनेवरून विचारला जाब…
साताऱ्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहित दोन जणांवर गंभीर आरोप केले आहेत. यापैकी एक आरोपी पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केलं आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सरकारला जाब विचारत आठ प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात, अशी टीकाही दानवेंनी फडणवीस यांच्यावर केली आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ’, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
अंबादास दानवेंचे सरकारला आठ सवाल
१. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?
२. ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?
३. महिला डॉक्टचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?
४. हे खासदार महोदय नेमके कोण?
५. या महिला डॉक्टरला बीड वरून हिनवणारे पीआय कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?
६. ‘पारदर्शक’ आणि ‘गतिमान’ शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?
७. चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?
८. या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?
…तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात’
दरम्यान, अशा प्रकारचे आठ सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे असंही म्हटलं की, ‘आज लाडकी बहीण पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे. फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात.. राजीनामा द्या’, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.


