तुमचा जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचावाच लागेल…
माजी मंत्री जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्षानंतर आमदार पडळकर यांनी आपला मोर्चा खासदार विशाल पाटील यांच्याकडे वळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगली जिल्ह्यातील विभूतवाडी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगलीतील प्रस्थापितांच्या विरोधात भाष्य केले आहे.
विभूतवाडी येथील कार्यक्रम दरम्यान, जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो ठेचावाच लागेल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटलांना दिला आहे. विशाल पाटलांकडून फक्त आटपाडी आणि जतमध्येच बैठका घेतल्या जातात. जिल्ह्यात इतर कुठेही त्यांच्या बैठका होत नाही. कारण, गोपीचंद पडळकर आटपाडी आणि जतमध्ये आहे, असं सांगत गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केली.
जयंत पाटील जिल्ह्यातल्या नेत्यांना सांगतात. माझ्याशी बोलायचं नाही. पण, जोपर्यंत गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका कराल. तोपर्यंतच काहीजण तुम्हाला जवळ करतील. पहिल्यांदा टीका कराल तेव्हा कॉफी दिली जाईल. दुसऱ्यांदा टीका केली तर बिर्याणी दिली जाईल. पण तिसऱ्यांदा टीका करेल त्यावेळी तुम्ही बाजूला व्हाल. दारापुढे उभारणारे आणि बूट उचलणारे कार्यकर्ते होऊ नका, अशा शब्दांत पडळकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही, असं सांगितलय. पण सिंह हा एकटा असतो. कळपात येत नाही, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम एकत्र असताना आपल्याशी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर जयंत पाटलांनी त्याच्याशी कशाला बोलता,असं विचारलं होतं. असा किस्सा सांगत पडळकर यांनी जयंतरावांवर टीकास्त्र सोडले.
मी संघर्षाला कधीही घाबरत नाही. मी संघर्षातूनच तयार झालो आहे. जितक्या फोर्सने माणूस माझ्या अंगावर येतो. तितकाच इंटरेस्टनं मला काम करायला मजा येते. राज्यातले अनेक मातब्बर, पैसेवाले मी बघितले आहेत. माजलेले पैसेवाले बघितलेत. त्यांचा माज जिरवलेला कार्यकर्ता मी आहे. जेव्हा मी मागे लागतो. तेव्हा त्याचं मी करिअर उद्ध्वस्त करतो. विनाकारण माझ्या मागे लागू नका. तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही. राजकारण दुरून खूप गंमतीचं दिसतं. पण एकदा रणांगण तापू द्या, असा इशाराही पडळकर यांनी दिला.
खासदारांच्या बैठका या जत आणि आटपाडी येथेच होतात. सांगली जिल्ह्याचे खासदार असताना केवळ आटपाडी आणि जतमध्येच खासदारांच्या मीटिंग होतात त्याचे कारण म्हणजे गोपीचंद पडळकर येथे आहे. सांगली, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ या ठिकाणी बैठका होतच नाहीत. इतका जातीयवादाचा तुमचा किडा वळवळत असेल, तर तो ठेचावा लागेल, असा इशाराही पडळकर यांनी दिला.


