‘या’ नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ…
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, या लढती सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला आहे.
महाविकास आघाडी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार) आणि महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार) या दोन्ही आघाड्यांतील घटक पक्ष निवडणुकीची रणनीती आखत आहेत. मात्र, या निवडणुका युती किंवा आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर, याचे चित्र अद्यापही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. काही ठिकाणी युतीची शक्यता असताना, काही भागांत स्वतंत्र लढत घेण्याची तयारी सुरू आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांना वेग आला असून, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला सतत धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी महायुतीत सामील झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका शिवसेना (ठाकरे) गटाला बसला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील अनेक नेते अजित पवार गट किंवा भाजपकडे वळले आहे. दुसरीकडे, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या घटक पक्षांमधील नेतेही आपापसात पक्षांतर करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हे पक्षांतर महायुतीतील अंतर्गत तणाव वाढवत असल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मोठा धक्का दिला आहे. गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेडीवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे पोरेडीवार गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय होते.
मात्र, आता त्यांनी काँग्रेसचा संग घेतला आहे. हा प्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे आयोजित मेळाव्यात झाला.
यासोबतच, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षला तेलमुले यांनीही आजच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट सोडून काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्षांतर ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटासाठी हे मोठे धक्के ठरत आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात पोरेडीवार आणि तेलमुले यांचा प्रभाव मोठा असल्याने, काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.


