भाजपाने स्वत:चे पैसे…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (२७ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन पार पडले.
दरम्यान या नव्या इमारतीसाठीच्या जागेवरून शिवसेनेच्या (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन उत्तर दिले आहे. ही जागा विकत घेतना महापालिकेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आमच्यावर दगड भिरकावण्याचा प्रयत्न करू नका असेही फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस काय म्हणाले?
भूमिपूजन पार पडल्यानंतर केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सगळ्यांची इच्छा होती की मुंबईत प्रदेशाला एक चांगलं कार्यालय मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही जागा शोधत होतो. फार सरकारी जागेच्या मागे न जाता परवडणारी, खाजगी जागा मिळवण्याचा प्रयत्न चालला होता. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली. या जागेत अनेक अडचणी होत्या. एक-एक अडचण आम्ही दूर केली. हळूहळू ही जागा आपण मिळवली काही लोकांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे, त्यांना मी सांगतो भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे उपर पत्थर फेंकने का प्रयास मत करो,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
विरोधक आरो करणार हे मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं असेही फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीस म्हणाले की, “मला पहिल्या दिवशी महिती होतं की, आपण ज्या वेळी कार्यालयासाठी जागा घेऊ, काही नतदृष्ट लोकं बसलेलेच आहेत. रोज ते प्रश्न विचारतील. त्यामुळे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की सरकारी जागा नको. जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेच सर्व नियम आपण पाळू कारण इकडच्या सर्व जागा लिजच्या जागा असतात. त्याची परवानगी घ्यावी लागते, पैसे भरावे लागतात.
जागेवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी ही जागा भाजपाने पैसे खर्च करून विकत घेतली असल्याचे सुनावले. “मी म्हणालो सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने…आपल्याला एकाही नियमात सूट नको, एकही शॉर्टकट नको. एखाद्या सामान्य माणसाने किंवा एखाद्या बिल्डरने देखील प्लॉट घेतला तर त्याला जे काही करावं लागेल ते सगळं भारतीय जनता पार्टी करेल. आम्ही सगळ्या परवानग्या घेत, जे जे करावे लागतं ती प्रत्येक गोष्ट करून, भारतीय जनता पक्षाने स्वत:चे पैसे खर्च करून ही जागा, विकत घेतलेली जागा आहे. ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
रोहित पवारांचा आक्षेप काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या जागेच्या मुद्द्यावर एक पोस्ट केली आहे. “आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाची जागा Lease Land असल्याचे, Shedule W ची जागा असल्याची तसेच lease renovation झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. Lease Land, Shedule W असलेली जागा lease renovation झाले नसल्यास विकता येते का? याचा खुलासा @mybmc आयुक्त करतील का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Lease Land, Shedule W जागा विकण्याचा पायंडा पाडला जाणार असेल तर उद्या महालक्ष्मी रेसकोर्स सारख्या अनेक महत्वपूर्ण जागा देखील खाजगी लोकांच्या घशात घातल्या जातील का? पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण दाबण्यासाठी ज्याप्रकारे सर्व मिडीया हाऊसेसला फोन करण्यात आले तसेच फोन आज मुंबईतील या जागेसाठी करण्यात आल्याचे देखील समजत आहे. त्यामुळे हे प्रकरण देखील गंभीर असून आयुक्तांनी खुलासा करण्याची गरज आहे. आयुक्तांनी खुलासा न केल्यास उद्या आम्ही आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची फाईल दाखवण्याची मागणी करू,” असेही रोहित पवार म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी अमित शाह याना या जागेबद्दल पत्र लिहिले होते. याबद्दल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, “मरीन लाइन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलेलं नाही. भूमिपूजन होऊनही मराठी भाषा भवन अडकून पडलं आहे. त्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. मात्र, आज केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन भाजपाच्या पंचतारांकित कार्यालयाचं भूमिपूजन करत आहेत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अजून हलली नाही. दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मात्र, भाजपाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल राफेलच्या वेगाने हलली. हे सगळं इतक्या वेगानं कसं झालं याचं रहस्य त्याच जमिनीखाली दडलं आहे. अमित शाह आज भूमिपूजन करत आहेत. त्यासाठी ते कुदळ मारतील तेव्हा हे रहस्य बाहेर येईल.


