खासदार रविंद्र चव्हाणांची टीका…
नांदेड जिल्ह्यातील दोन नेते खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या एकमेकांवर तुटून पडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आणि प्रचाराला सुरूवात झाली असून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील मित्रपक्षांनी रणशिंग फुंकले आहे. गेली वर्षभर शांत असलेले अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे आता शिंगावर घेण्याची भाषा करू लागले आहेत. गेल्या महिनाभरापासून दोघेही टीकेचे फटाके फोडताना दिसत आहेत.
एकमेकांचे पारंपारिक राजकीय विरोधक शत्रू म्हणून चव्हाण-चिखलीकर नांदेडमध्ये ओळखले जातात. सध्या दोघेही सत्ताधारी पक्षात असले तरी त्यांच्यात सुरू असलेला वाद, आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा म्हणजे नाटक असल्याची टीका काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. अशोक चव्हाण-चिखलीकर यांचा हा खेळ नांदेडकर चांगलाच ओळखून आहेत. निवडणुका आल्या की एकमेकांना शिव्या घालायच्या आणि नंतर गळ्यात गळे घालायचे हे आम्हाला नवीन नाही.
नांदेडची जनता या दोघांना चागंलीच ओळखून आहे. त्यांच्या या खोट्या भांडणाला मतदार यावेळी भूलणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही रविंद्र चव्हाण म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने ज्यांना पद, प्रतिष्ठा, राज्याचे नेतृत्व करण्याची एकदा नव्हे तर दोनवेळा संधी दिली ते सत्तेसाठी काँग्रेस सोडून गेले. लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या महायुतीला भोगावे लागले.
वसंतराव चव्हाण यांच्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस नेत्याला नांदेडच्या जनतेने निवडून दिले. पण दुर्दैवाने त्यांचे काही महिन्यातच निधन झाले. पक्षाने मला उमेदवारी दिली, मतदारांनी पुन्हा मला निवडून देत काँग्रेस पक्षावर चव्हाण कुटुंबावर विश्वास दाखवला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. लोकसभेत मिळाले तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळेल, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
भांडतील अन् पुन्हा एकत्र येतील..
अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे दोन नेते सध्या एकमेकांवर टीका करत आहेत. परंतु नांदेडकरांसाठी हे नवे नाही. निवडणुका आल्या की हे दोघे भांडल्यासारखे करतात. चिखलफेक करत मतदारांची आणि नांदेडच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता लोक हुशार झाली आहेत. त्यांना ही सगळी नाटक कळतात. मतांसाठी भांडण करायची आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र यायचे असा प्रकार आता नवा नाही. आज भांडणारे अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र आलेले दिसतील, असा दावाही रविंद्र चव्हाण यांनी केला.


