राष्ट्रवादीने ठाम नकार देत केली मोठी घोषण…
रायगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सुरू असणाऱ्या वादामुळे महायुतीत तणाव वाढताना दिसत आहे. शिवसेनेनं दिलेला फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेसने ठामपणे नाकारला आहे. यामुळे रायगडमध्ये जागावाटपावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने जागावाटपाचा नवा फॉर्म्युला तयार केल्याचे कळत आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपला 24, शिवसेना 24 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 जागा देण्याचे सूत्र आहे. तर समान (20) जागा मिळाल्याशिवाय युती शक्य नाही अशी ठाम भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे. याच भूमिकेमुळे आता महायुतीचे गणित बिघडले आहे.
रायगड जिल्हा परिषदेत एकूण 59 जागा आहेत, त्यापैकी बहुतांश जागांवर स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांचा प्रभाव वेगवेगळ्या भागात दिसून येतो. तर यावरून शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी देखील प्रत्येक आमदाराला 8 या प्रमाणे जागा वाटप करण्याचे सूत्र मांडले होते. पण तटकरे यांनी असा कोणताच प्रस्ताव आलेला नाही असे म्हणत युतीचा प्रस्ताव नाकारला होता. दरम्यान आता भाजपने देखील हाच प्रस्तावात समोर ठेवला असून प्रत्येकी 8 जागा येतील असे नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यात भाजपकडे 3, शिवसेनेकडे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे. तर एक खासदारही राष्ट्रवादीचा आहे. यामुळे भाजप 24 जागा, शिवसेना 24 जागा आणि राष्ट्रवादीला 11 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा प्रस्ताव नाकारण्यात आला असून जागा वाटपाचा फार्म्युला खासदार आणि आमदारांच्या संख्येवर नाही तर कोणत्या पक्षाचा प्रभाव अधिक आहे. यावर ठरले पाहीजे. तर दक्षिण रायगडमध्ये रायगडचा अधिक प्रभाव असल्याने किमान 20 जागा मिळायला हव्यात. अन्यथा युती शक्य नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
त्यांनी, दक्षिण रायगडमध्ये तळे, माणगाव, महाड, पोलादपूर, खोपोली कर्जत अशा अनेक भागांत राष्ट्रवादी मजबूत आहे. तर उत्तर रायगडमधील पेण, अलिबाग, उरण, पनवेल येथे भाजपचे प्राबल्य दिसते. यामुळे “20-20-20” असे समान वाटपाचे सूत्र महायुतीत हवे अशीही मागणी राष्ट्रवादीकडून आता पुढे येत आहे.
पण ही मागणी शिवसेना व भाजप अमान्य केली असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शिवसेनेचा जनाधार अधिक आहे. तर ‘ग्राऊंड कनेक्ट’ राष्ट्रवादीपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे. तर समान वाटप शक्य नसल्याचेही म्हटलं आहे.
दरम्यान रायगड जिल्ह्यात सध्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले आहेत. या वादामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केले आहेत. तर राष्ट्रवादीनेही त्याला उत्तर दिले आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत बिघाड झाला आहे. पण तरिही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी महायुतीच म्हटल्यास स्थानिक नेत्यांना एकत्र यावेच लागेल. पण पालकमंत्री पदावरील संघर्ष आणि परस्पर टीका पाहता महायुती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी स्थानिकमध्ये येथे काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


