पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती ११२ इंचाची आहे. जर त्यांना वाटले असते तर ५ तासांत पाकिस्तानवर कब्जा केला असता असं विधान केंद्रीय मंत्री आणि एनडीएच्या हिंदूस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे.
बिहारमध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मांझी यांनी राहुल गांधी यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात नरेंद्र मोदींनी सरेंडर केले आणि ऑपरेशन सिंदूरला विराम दिला असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यावर राजापाकर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेत जीतनराम मांझी म्हणाले की, नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची आहे. त्यांच्या हातात बिहार सुरक्षित राहील. पुलवामा दहशतवाद्यांनी महिलांचे कुंकू पुसले तेव्हा दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवला. मोदींना जर वाटले तर ते ५ तासांत संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा करतील. परंतु पाकिस्तानी जनतेचा काही दोष नाही. त्यांच्याशी काही शत्रूता नव्हती त्यामुळे युद्ध थांबवण्यात आले असं मांझी यांनी म्हटलं.
तर कर्पूरी ठाकूर यांचा जनता जननायक असा सन्मान करत होती. मात्र राजदवाल्यांनी तेजस्वी यादव यांना जननायक उपमा दिली आहे. ही उपाधी चोरी केलेली आहे. त्या लोकांना मत देण्याची गरज नाही. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बिहार विकसित राज्य बनेल. बिहारच्या विकासासाठी नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांना खूप सहकार्य केले. डबल इंजिन सरकार बिहारला चांगल्या प्रकारे चालवत आहे. त्यामुळे लोकांनी दुसऱ्या कुणावर विश्वास ठेवू नये. जे लोक गरिबांचा हक्क हिरावून कशीही सत्ता काबीज करू इच्छितात त्यांना दूर सारा असंही केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी आवाहन केले.
दरम्यान, लालू यादव जेलमध्ये गेले होते. तेजस्वी यादव जामीनावर बाहेर आहे. हे दोघेही चोर आहेत. त्यांची चोरी करण्याची सवय मोडली नाही. लालू प्रसाद यादव यांनी घराणेशाहीचं राजकारण केले. जर लालूंना संधी मिळाली असती तर त्यांनी मुख्यमंत्री त्यांच्या मुलाला किंवा मुलीला केले असते. परंतु त्याउलट नितीश कुमार यांनी एका मजुराच्या मुलाला मुख्यमंत्री बनवले होते असं सांगत जीतनराम मांझी यांनी नितीश कुमार यांचं कौतुक केले.


