धंगेकरांचा पुढचा टार्गेट फिक्स; आदित्य ठाकरेंनीही डाव साधला…
पुणे : पुण्यातील भाजप नेत्यांवर शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे. सुरुवातीला गुंड निलेश घायवळ प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
त्यानंतर जैन बोर्डिंग जमिनीच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी आरोपांची राळ ठेवली होती. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी आपलं पुढचं टार्गेट फिक्स केलं आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने हे रवींद्र धंगेकर यांचं पुढचं टार्गेट असल्याचे संकेत त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिले होते.
पुण्यातील लोकमान्य नगर वसाहतीमध्ये हेमंत रासने यांनी पुनर्विकासाला विरोध करत या वसाहतीच्या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या कामाला स्थगिती मिळवली असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या प्रकरणात आपण खोलवर जाणार असून यामधील दोषींना सोडणार नसल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले होते. धंगेकरांनी हे प्रकरण हाती घेण्याआधीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकमान्य नगर वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात X पोस्ट करत थेट महायुती सरकारलाच आरोपीच्या कटघड्यात उभं केलं आहे.
‘निवडणुक आयोगाच्या कृपेने आलेलं महाराष्ट्रातलं सरकार अल्पावधीतच ‘बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार’ झालंय. पुण्यातल्या लोकमान्य नगरचंच उदाहरण पहा. तिथल्या पुर्नविकासाचा मार्ग स्थानिक रहिवाश्यांनी निवडला असताना आणि त्यांना तो विकास हवा असतानाही, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने ह्या पुर्नविकासाला स्थगिती दिली. झटक्यात असं करण्याचं कारण काय होतं? आता ‘क्लस्टर’ विकासाच्या नावाखाली ही जागा सत्ताधाऱ्यांच्याच जवळच्या एका बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरु झालाय का? स्थानिकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून न घेता जर मुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील तर सरकार नेमकं कोणाचं आहे? सरकार हे जनतेचं आहे की बिल्डर्सचं?’ असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांनंतर आता पुण्यामध्ये आणखी हेमंत रासने यांच्या रूपाने एका भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ होण्याचे चित्र आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
लोकमान्यनगर परिसरात १९६० ते १९६४ या काळात एकूण ५३ इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या या परिसरात सुमारे ८०३ कुटुंबे राहतात. त्या काळातील सर्व इमारती लोड-बेअरिंग पद्धतीने उभारण्यात आल्या असल्याने आता त्यांची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे. काही ठिकाणी सिमेंटचे प्लास्टर निखळले असून भिंतींमध्ये झाडे उगवलेली दिसतात. अनेक ठिकाणी स्लॅब पडले किंवा गळू लागले आहेत, तर भिंतींना मोठ्या चिरा पडल्याने संरचनात्मक धोका निर्माण झाला आहे.


