नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाने दिला महाराष्ट्राचा दाखला !
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी असे दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
निवडणूक प्रचारादरम्यान, महाआघाडीने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विविध प्रकारे टीका सुरू केली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ जेडीयूचे नेते आणि सल्लागार के.सी. त्यागी यांनी नितीश कुमार यांची प्रकृती, प्रतिस्पर्धी तेजस्वी यादव, जन सुराज पक्ष व प्रशांत किशोर यांचा उदय आणि मुख्यमंत्रीपदाबाबत द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या या मुलाखतीत के.सी. त्यागी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना नितीश कुमार एकनाथ शिंदे नाहीत असेही भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एनडीएची सत्ता आल्यास नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावर ठाम राहतील असे दिसत आहे.
यापूर्वी नितीश कुमार आणि भाजपा २०१० आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढले होते. त्या दोन्ही वेळी नितीश कुमार यांना एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. पण, यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांची एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान द इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत के.सी. त्यागी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अलिकडच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अमित शहा म्हणाले होते की, एनडीए नेते निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडण्यासाठी चर्चा करतील.
याला उत्तर देताना के.सी. त्यागी म्हणाले की, “जर आमचे विरोधक महाराष्ट्रातील घटनेकडे लक्ष वेधत असतील तर मी हे स्पष्ट करतो की, नितीश कुमार हे एकनाथ शिंदे नाहीत आणि कोणीही त्यांना तसे बनवू शकत नाही. नितीश कुमार हे स्वतः एक प्रमुख नेते आहेत. ते जवळजवळ २० वर्षे मुख्यमंत्री आहेत. मी अमित शहा यांच्या विधानांचा कोणताही अर्थ काढला नाही. कारण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नावाला डझनभराहून अधिक एनडीए नेत्यांनी (काही भाजपा नेत्यांनी) पाठिंबा दिला आहे. लढाईच्या मधेच कर्णधार बदलता येत नाही.
महाराष्ट्रात काय घडले?
महाराष्ट्रात २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपाबरोबर सरकार स्थापन केले होते. तेव्हा आमदारांची संख्या अधिक असूनही भाजपाने अडीच वर्षांसाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. पण, २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीने पुन्हा बहुमत मिळवले. त्यानंतर मात्र, भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने स्वतःचा मुख्यमंत्री बनवला.


