राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी…
गेल्या काही दिवसांपासून धाराशिवमध्ये शहरातील रस्ते विकास निधीवरुन राजकीय वाद पेटल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवीताला शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) असलेल्या सुप्त संघर्षामुळे हा वाद रंगल्याचे सांगितले जाते होते.
मात्र, आता भाजपचे नेते राणा जगजितसिंह यांच्या समर्थकांनी अचानक ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणारे बॅनर्स संपूर्ण शहरात लावले आहेत.
पक्षप्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्याकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा, हीच तुझी लायकी आशयाचे बॅनर धाराशिव शहरात लागले आहेत. हे बॅनर्स राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी लावल्याची चर्चा आहे. या बॅनर्सवर स्पष्टपणे कोणाचा उल्लेख नसला तरी या माध्यमातून ओमराजे निंबाळकरांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा धाराशिवमध्ये रंगली आहे.
गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या धाराशिवमधील 170 कोटीच्या रस्ते विकासाच्या कामाची स्थगिती दोन दिवसांपूर्वी उठवली होती. यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. परंतु, त्यानंतर अवघ्या अवघ्या दोन दिवसांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः तक्रार करत नगर विकास खात्याकडून या कामावर पुन्हा स्थगिती आणली होती. याच मुद्द्यावरून महायुती मधील पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात वाद सुरु झाला होता. मात्र, या वादात राणा जगजितसिंह समर्थकांनी अचानक ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य करुन राजकीय गोंधळात भर टाकली आहे.
नेमकं प्रकरण काय?
धाराशिव शहरातील रस्ते कामांसाठी 117 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला म्हणून शहरात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अभिनंदनाचे बॅनर लागले. मात्र, त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून या कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली. रस्ते कामाच्या स्थगितीसाठी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दोनवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे लेखी तक्रार करण्यात आली. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातला हा सुप्त संघर्ष असला तरी या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना भाजपमधील धुसफूस समोर आली आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे लेखी तक्रारीत आक्षेप नेमके काय?
1. निविदा कामामध्ये अपारदर्शकता, विलंब आणि मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करण्यात आली
2. रस्ते कामाच्या टेंडरमध्ये Bid व्हॅलिडीटी आणि Bid कॅपॅसिटीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
3. राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी काही निवडक निविदा 15 टक्के वाढीव दराने काढल्याचा आरोप
4. राजकीय हस्तक्षेप आणि खोट्या कागदपत्राच्या आधारावर निविदाधारकाने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचा आरोप
5. पालकमंत्री म्हणून फेरनिविदेच्या सूचना दिल्या, फेरनिविदा झाल्यानंतर सरकारचे आणि नगरपरिषदेचे पैसे वाचले असते, मात्र जाणीवपूर्व त्याकडे दुर्लक्ष केल्याच सरनाईक यांची तक्रार
6. धाराशिव नगरपरिषदेच्या तात्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी ठेकेदाराचे हित पाहून निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप
7. तत्कालीन मुख्याधिकारी धाराशिव नगरपरिषद यांनी केलेला विलंब, हलगर्जीपणा आणि अपारदर्शकता त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली
8. त्यामुळे रस्ते कामांची फेरनिविदा न राबवता त्याच ठेकेदाराला पुन्हा कार्यारंभ आदेश देणे योग्य ठरणार नाही अशी तक्रार यांनी केली होती. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने कामाला स्थगिती दिली
मुख्यमंत्र्यांकडे मागितली दाद, लवकरच कामे सुरू होणारः भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींचा दावा
जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीला गृहीत धरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकरवी धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नालीच्या कामावर स्थगिती आणली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे दाद मागितली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नगरोत्थान योजनेतून या कामासाठी ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नाल्यांची कामे करण्यासाठी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. हे काम सुरू झाले तर आपली अकार्यक्षमता लोकांसमोर येईल, या भीतीने काही अपप्रवृत्तीच्या राजकीय विरोधकांनी या कोमात खोडा घातला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
धाराशिव शहरातील रस्त्यांची गेल्या अनेकत महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी आमदार राणाजगजतिसिंह पाटील साहेब यांनी प्रयत्न केले. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून ५९ रस्ते आणि नालींच्या कामासाठी ११७ कोटी रुपये मंजूर झाले. निधी मंजूर झाला, आता कामे सुरू झाली तर आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल, या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामात आडकाठी आणण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विविध हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला.
मात्र, आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी रस्त्यांच्या कामाचा विषय लावून धरला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यानुसार धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, त्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आधारावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असेही दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
धाराशिव शहरात जवळपास सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील हजारो नागरिकांना मणक्याचे आजार झाले आहेत. अबालवृद्ध व माता भगिनींना प्रवास करणे असह्य झाले आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.


