 
                शिवसेना,मनसे, राष्ट्रवादी सह सत्ताधारी भाजप पक्षांचीही (SDO) विश्वास गुजर यांच्याकडे मागणी !
ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा:- कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या संदर्भात आज दिवा शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांसह सत्ताधारी भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने देखील संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
या पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, प्रभाग क्र. २७ आणि २८ क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण १७,२५८ इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली.
तसेच, भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी सर्वच पक्षांकडून करण्यात आली आहे.
दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना (उबाठा) पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, शिवसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखॲड.रोहिदास मुंडे, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक तर भारतीय जनता पार्टीचे दिवा (मंडल) शहर अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम, प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, जग्गत सिंग, प्रवीण सिंह, हिरामण गंगावसे आदी उपस्थित होते.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                