आंदोलन संपवलं; पण आक्रमकपणा कायम…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करीत होते. सरकारच्यावतीने योग्य वेळी कर्ज माफी दिली जाईल असे सांगण्यात येत होते. जाहीरनामा पाच वर्षांचा असतो असे सांगण्यात येत होते.
यावर योग्य वेळ केव्हा येणार अशी विचारणा सातत्याने केली जात होती. सरकार तारीख जाहीर करीत नव्हते. पळत होते. मात्र शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे सरकाराला तारीख जाहीर करावी लागली, असा दावा बच्चू कडू यांनी केला. याउपरही सरकारने तारीख चुकवली तर त्यांना सळो की पळो करून सोडू, जिथे उभे राहील तिथे झोडून काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले होते. वाहतूक कोंडीमुळे नागपूरकरांची मोठी अडचण झाली होती. त्यानंतर सरकारच्यावतीने कडू यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावणे आले. गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत 30 जूनच्या आत कर्जमाफी देण्याची निर्णय घेण्यात आला. ही बैठक आटोपून बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांसोबत संवाद साधला.
आम्ही सरकारकडून कर्जमाफीही तारीख घेऊन आलो. 150 सभा घेतल्या. अन्यात्याग, उपोषण, पदयात्रा काढल्या. 200 दिवस जागलो. त्यानंतर आंदोलनाला मोठे यश मिळाले. राजू शेट्टी, वामनराव चटप, रविकांत तुपकर, अजित नवले या शेतकऱ्यांची साथ लाभली. याचे सर्व श्रेय शेतकऱ्यांना जाते. त्यांच्यामुळेच सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली असेही कडू यांनी सांगितले.
आमचे आंदोलन संपले नाही. स्थगित झाले आहे. उद्या सरकाराने पुन्हा काही चालबाजी केली तर आम्ही तयार आहोत. या दरम्यान आम्ही सरकारवर वॉच ठेवणार आहोत. त्यांनी स्वस्थ बसू दिले जाणार नाही. अधिकाऱ्यांनी किंवा सरकारने कुठे काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडणार नाही. सरकारने कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या वर्षीचे कर्जसुद्धा माफी व्हावे याकरिता जून महिन्यापर्यंत थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने मानले आभार
कर्जमाफीसाठी राज्य सरकारला येत्या काळात पैशाची जमवाजमव करणे अवघड आहे. मात्र ती होईल. सरकार मार्ग काढले. तो त्यांचा प्रश्न आहे. आर्थिक अडचण असतानाही कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार यावेळी बच्चू कडू यांनी मानले.


