ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल !
बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. दोन टप्प्यात याठिकाणी मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला बिहारचा निकाल जाहीर होईल. त्याआधी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारात गुंग आहेत.
त्यातच भाजपा उमेदवार मैथिली ठाकूर यांच्या मुलाखतीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या मुलाखतीत ब्ल्यू प्रिंटबाबत मैथिली ठाकूर यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून लोकांनी ट्रोल केले आहे.
बिहारमध्ये उद्योग येत नाही, ज्या कंपन्या आहेत त्या बंद पडतायेत. बिहारमधून स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या २० वर्षात स्थलांतरण बंद झाले नाही मग ५ वर्षात कसं होईल असा प्रश्न पत्रकाराने भाजपा उमेदवार मैथिली ठाकूर यांना विचारला होता. तेव्हा ५ वर्ष पाहा, त्यानंतर हा प्रश्न विचारा असं मैथिली यांनी म्हटलं. त्यावर तुमची ब्ल्यू प्रिंट काय आहे असा प्रतिप्रश्न मुलाखत घेणाऱ्याने विचारला. त्यावर ब्ल्यू प्रिंट मी कॅमेऱ्यावर कशी सांगू शकते, ती खूप वैयक्तिक बाब आहे असं उत्तर मैथिली यांनी दिले. मुलाखतीतील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
तसेच सगळीकडे जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख आहे. ब्ल्यू प्रिंटबाबत बोलाल तर ते आम्ही अंमलात कसे आणणार हे आम्ही आता सांगू शकत नाही. जेव्हा ते अंमलात येईल तेव्हा सगळ्यांना दिसेल. स्थलांतर आणि रोजगार याचे कनेक्शन पाहिले तर प्रत्येक घरात सरकारी नोकरी देणे प्रॅक्टिकल नाही. सध्या पक्षात धोरणांबाबत बोलले जात आहे ते मी समजून घेत आहे. अनेक उद्योजक आहेत ते आमच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर राज्यात गुंतवणूक करण्यासाठी थांबले आहेत. मी एक युवा आहे. काय काय गोष्टी येणार आहेत त्या मला माहिती आहेत. त्यामुळे ५ वर्ष विश्वास ठेवा असंही मैथिली ठाकूर यांनी म्हटलं.
कोण आहे मैथिली ठाकूर?
२५ जुलै २००० साली बिहारच्या मधुबनी येथे जन्मलेली मैथिली ठाकूर एक लोकप्रिय शास्त्रीय गायिका आहे. आजोबांपासून वडिलांपर्यंत तिने भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. २०१७ साली गाण्याच्या रियालिटी शोमध्ये ती रनर अप बनली होती. सोशल मीडियावर त्यांचे फॅन फोलोईंग भरपूर आहेत. अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून रिंगणात आहे.


