भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार…
एकीकडे भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत अंतिम निर्णय होणे बाकी असताना, दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये महत्वाचा संरक्षण करार झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या कराराची घोषणा केली.
हा करार दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांच्या नव्या दशकाचा प्रारंभ मानला जात आहे.
संरक्षण भागीदारीचे नवे युग- राजनाथ सिंह
संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी 10 वर्षांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार केला आहे. मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथे झालेल्या बैठकीनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याबाबत राजनाथ सिंह यांनी एक्स हँडलवर माहिती देताना सांगितले की, “पीटर हेगसेथ यांच्यासोबत कुआलालंपूरमध्ये यशस्वी बैठक झाली. भारत-अमेरिका मेजर डिफेन्स पार्टनरशिपसाठी 10 वर्षांच्या फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करण्यात आली. हा करार आमच्या संरक्षण सहकार्याच्या नव्या युगाची सुरुवात करेल.
अमेरिकेची प्रतिक्रिया
या कराराबाबत अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी म्हटले, “भारतासोबतचा हा करार ऐतिहासिक आहे. अशा स्वरुपाचा करार याआधी कधीच झाला नव्हता. हे दोन्ही देशांमधील रणनीतिक समन्वय दृढ करण्याचा प्रयत्न आहे.”
या संरक्षण कराराचे प्रमुख मुद्दे
दोन्ही देश संरक्षण आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करतील.
संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षमता विकास क्षेत्रात सहकार्य वाढवले जाईल.
हिंद-प्रशांत महासागरात संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा उपक्रम राबवले जातील.
क्षेत्रीय स्थैर्य राखण्यासाठी संरक्षण धोरणांमध्ये समन्वय साधला जाईल.
हिंद-प्रशांत क्षेत्र महत्वाचे
हिंद-प्रशांत प्रदेश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्रिय क्षेत्रांपैकी एक मानला जातो. या प्रदेशात आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार खंडांचा समावेश आहे आणि जगातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या या क्षेत्रात राहते. पूर्वी या प्रदेशात अमेरिकेचा दबदबा होता, परंतु गेल्या काही दशकांत चीनचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अनेक देशांना चिंता आहे की, चीन या प्रदेशात आपला वर्चस्वशाली प्रभाव निर्माण करू शकतो. या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका संरक्षण कराराला चीनविरोधी रणनीतिक संतुलनाची हालचाल मानली जात आहे.


