ही शेतकऱ्यांची थट्टा केंद्रीय कृषीमंत्री संतापले;अधिकाऱ्यांना झापझाप झापलं…
महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरकारकडे आणि विमा कंपन्यांकडे मदतीची आशा आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतही केली जात आहे.
पण पालघरच्या वाडा तालुक्यातील सिल्लोत्तरमध्ये एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बँक खात्यात फक्त 2 रुपये 30 पैसे मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्लोत्तरमधील मधुकर बाबुराव पाटील यांच्या नावावर अकरा एकर जागा आहे. नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यात पीक विमाचे केवळ अडीच रुपये जमा झाले आहेत. प्रधानमंत्री फसल योजनेतून हे अडीच रुपये जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आला आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे मधुकर पाटील यांच्यासह देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक, दोन, पाच ते 21 रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान संतापले आहेत.
केंद्रीय कृषी, कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मुद्द्यावरुन आज उच्च स्तरीय बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत जोडलं आणि तिथेच अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत प्रश्न विचारले. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देणार नाही आणि त्रासही होणार नाही, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी दिली.
ही शेतकऱ्यांची थट्टा, शिवराज सिंह संतापले
शेतकऱ्यांना 1, 2, 5 किंवा 21 रुपयांचा विमा क्लेम मिळणं ही शेतकऱ्यांची शुद्ध थट्टा आहे. सरकार आता असं होऊ देणार नाही”, अशा शब्दांत शिवराज सिंह बैठकीच कडाडले. यावेळी त्यांनी अशाप्रकारचे पैसे कसे देण्यात आले? याबात चौकशी करण्याचे आदेश दिले. “शेतकऱ्यांना विम्याचे पैसे तातडीने आणि सर्वांना एकाच वेळा मिळायला हवेत”, असंही कृषीमंत्र्यांनी यावेळी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. तसेच योजनेच्या अंमलबजावणीत आवश्यकतेनुसार योग्य बदल करण्याचेदेखील निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
“प्रधानमंत्री फसल विमा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नैसर्गिक संकाटाच्या काळात देशातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान सारखी आहे. पण काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे या योजनेची बदनामी झाली आहे. त्यामुळे या योजनेची थट्टा होत आहे. अशाप्रकारच्या घटनांमुळे विरोधकांना प्रोपेगेंडा बनवायची संधी मिळते”, अशी खंत शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी व्यक्त केली


