राज्य सरकारकडून निधीचा पाऊस; बदल्या नियुक्त्यांना धडाधड मान्यता!
राज्यात नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तासांत 220 हून अधिक शासन निर्णय जारी करण्याचा रेकॉर्ड करण्यात आला.
यामध्ये महापालिकांसह नगर परिषद व नगर पंचायतींवर निधीची मुक्त उधळण करण्यात आली आहे.
बदल्या, नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या, शासकीय तंत्रनिकेतनास मान्यता देण्याचे शासन निर्णय धडाधड जारी करण्यात आले. ब्राह्मण समाजासाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळ, राजपूत समाजासाठी स्थापन केलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी स्थापन केलेल्या श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
निधीचा पाऊस पाडला-
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 187 कोटी 98 लाख रुपयांचा निधी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना रब्बीसाठी बियाणे खरेदीला 3 हजार 499 कोटी 84 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींना पाच कोटी रुपयांपासून दहा कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात आला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशिष्ट नागरी सुविधा पुरवण्यासाठी निधी दिला आहे.
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर-
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहेत.या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. मुंबईतील सचिवालय जिमखान्यात झालेल्या या पत्रकार परिषदेला आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.
4 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही 21 महत्वाचे निर्णय-
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींची निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने 4 नोव्हेंबर रोजी 21 महत्त्वाचे निर्णय जाहीर करून घोषणांचा धडाका लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जनविश्वास अध्यादेशाला मान्यता, नवी तंत्रनिकेतन, मच्छीमारांच्या कर्जावर व्यासवलत यांसह विविध निर्णय घेण्यात आले


