सरकारच्या त्या जाहिरातीवर संताप व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांना धाडले पत्र…
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे हे सक्रिय राजकारणापासून गेले काही दिवस दूर होते. मात्र, आता ते लोकांमध्ये जात समस्या सोडवताना दिसत आहेत. नुकतेच राज्य निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा केली.
दरम्यान, मुंडे देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने रिक्त जागांसाठी काढलेल्या जाहिरातींमध्ये एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याने मुंडेंनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी संताप व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांना पत्र धाडलं आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कंत्राटी पद्धतीने 3500 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. मात्र, या भरतीमध्ये एनटी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एनटी प्रवर्गातील विद्यार्थी, उमेदवारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आता राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनीआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्र लिहून ही जाहिरात रद्द करण्याची, व नव्याने प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. त्यामुळे, सरकार आता धनंजय मुंडेंच्या या मागणीची दखल घेऊन एनटी प्रवर्गातील उमेदवारांचा विचार करणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 4 नोव्हेंबर 2025 रोजी समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदाच्या सुमारे 1974 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिराती मध्ये एन टी डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र. ०१/२०२५ 4 नोव्हेंबर 2025 यान्वये एकूण 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून या जाहिराती मध्ये एन टी प्रवर्गातील अ, ब, क, ड या चारही प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी असून ते या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या एन टी प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी दूरध्वनी व्दारे तसेच विविध माध्यमातून माझ्याकडे तक्रार केली असून, या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी सुमारे 3,500 जागांमध्ये एकही जागा आरक्षित नसलेबाबत संताप व दुःख व्यक्त केले आहे. अशी माहिती मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी जागा आरक्षित नसणे हे गंभीर व अन्यायकारक असून, तातडीने या जाहिरातीस स्थगिती देऊन, आरक्षित पदांची फेरतपासणी करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. तरी, आपणास विनंती की कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही यासाठी या दोन्हीही जाहिरातीस स्थगिती देऊन नव्याने जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावी, अशी विनंती देखील मुंडे यांनी केली आहे.


