अभिनेता विजय थालापती यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कळघम (TVK) पक्षाच्या विशेष बैठकीत आज (बुधवार) मोठे निर्णय घेण्यात आले. थालापती विजय यांची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणासोबत युती करणार, याचा अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विजय यांना देण्यात आला आहे.
महाबलीपुरम येथील एका हॉटेलमध्ये विजय यांच्या उपस्थितीत पक्षाची ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला की, विजय हे “सर्वसामान्यांचे आवडते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार” असतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष 2026 ची विधानसभा निवडणूक लढवणार असून, निवडणुकीतील युतीबाबतचे सर्व निर्णय घेण्यास त्यंना पूर्णपणे अधिकार असतील अशी घोषणा करण्यात आली. तमिळगा वेट्री कळघम (TVK) पक्षाच्या विशेष बैठकीत एकूण 12 ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये श्रीलंकेच्या नौदलाकडून तमिळनाडूतील मच्छिमारांना वारंवार होणारी अटक आणि राज्यातील महिलांची सुरक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाली.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये करूर येथे विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 लोक मरण पावले होते. या घटनेतील मृतांना बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. भविष्यात पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये विजय आणि सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही एका ठरावात करण्यात आली. तमिळगा वेट्री कळघम पक्षाने 2026 ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पक्षासाठी अनुकूल असल्यामुळे, पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावली होती. असं समजते. अलीकडच्या काळात विजय हे सध्याच्या सत्ताधारी DMK पक्षावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांपुर्वी अभिनेता विजय थालापती यांच्या तामिळनाडूतील करुरमधील एका रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली होती. या दुर्घटनेत 41 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून अनेक जण जखमी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह पंतप्रधान मोदींकडून या घटनेवर शोक व्यक्त केला होता. या दुर्घटनेतील मृतांना बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
