राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.
दरम्यान निवडणुकीची घोषणा होताच, आता सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी युती आणि आघाडी करून तर काही ठिकाणी स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आता पक्षांतराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीमधून काही जण महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. तर काही नेत्यांनी आपल्याच मित्र पक्षात प्रवेश केल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंगला सुरुवात झाली, ते इनकमिंग अजूनही सूरूच असल्याचं दिसत आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांची देखील उपस्थिती होती.
मागील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुधीर खरटमल यांनी स्वतः न जाता प्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्याला पाठवले होते, त्यानंतर शरद पवार गटातून शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यावर शरद पवार यांच्या बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आज त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला ऐन निवडणुकीच्या तोडांवर धक्का मानला जात आहे.


