मंत्र्याचं पोरगं चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमिनी खरेदी व्यवहारावर आरोप होत आहे. या जमिन व्यवहारावरुन विरोधकांनी रान उठवले असून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत आहेत.
यावर राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अण्णा हजारे यांनी दिला आहे. 1804 कोटी रुपये किंमतीची कोरेगाव पार्क येथील जमीन केवळ 300 कोटी खरेदी झाल्याचा प्राथमिक तपासात आढळले आहे. प्रशासनाकडून 21 कोटींची स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आल्यानं, या खरेदी व्यवहारात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी पार्थ पवार जमिन व्यवहारावर प्रतिक्रिया दिली आहे. “एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात,” अशा शब्दात अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
अण्णा हजारे म्हणाले की अशा प्रकरणात राज्य सरकारने विशेष धोरण आखले पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. असे विषय हे फक्त कारवाई करुन थांबणार नाही. सरकारने अशा प्रकरणात कठोर पावले उचलणे गरजचे आहे. दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.
काय आहे प्रकरण
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या १ लाखांचे भाग भांडवल असलेल्या अमेडिया या कंपनीने तब्बल 1804 कोटी किंमतीची जमीन, फक्त 300 कोटींत खरेदी केली आहे.
ही जमिन ती महार वतनाची आहे. ती अमेडियाने खरेदी केली, महार वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. तरीही हा व्यवहार कसा झाला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या प्रकरणात मोठ्या व्यक्तीनेच सूत्रे हलविल्याचा विरोधकांना संशय आहे.


