धनंजय मुंडे यांचे मनोज जरांगेंना ओपन चॅलेंज !
मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केली आहेत. मला मारण्याचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचा दावा त्यांनी केला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट बोलताना धनंजय मुंडे दिसले आहेत.
धनंजय मुंडे म्हणाले की, माझे आणि त्यांचे काहीच वैर नाही. मागे मी मुंबईच्या आंदोलनात देखील सहभागी झालो होतो. मी एकही आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला नाही. मनोज जरांगे पाटील यांना वाटते की, धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीवरच राहू नये, 17 तारखेच्या मेळाव्यात मी मनोज जरांगे पाटील यांना दोन प्रश्न विचारली होती. मात्र, त्याची उत्तरे मला अजूनही मिळाली नाहीत.
पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की, मी मंत्री असताना माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण सोडले. तुम्ही हाकेंना मारले, तुम्ही वाघमारेंना मारले, अशी बरीच उदाहरणे आहेत. 17 तारखेच्या सभेत मी जरांगेंना दोनच प्रश्न विचारले. त्याचे उत्तर अजून मिळाले नाही. पहिला प्रश्न विचारला होता, मराठा समाजाला ओबीसीत जाऊन फायदा आहे की ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे. याबाबत साडेबारा कोटी जनतेसमोर त्यांनी यावं, आम्ही येतो. कशात फायदा आहे यावर सोक्षमोक्ष करूयात.
त्याचे उत्तर अजून आले नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदा होऊन जाऊद्या, असे त्यांनी म्हटले. यासोबतच धनंजय मुंडे यांनी मोठा दावा करत म्हटले की, कट रचणारे कार्यकर्ते त्यांचे, बोलणारे कार्यकर्ते त्यांचे आणि आरोप माझ्यावर. माझे म्हणणे आहे की, या प्रकरणात पोलिसांना म्हणणे आहे की, या सर्व प्रकरणाची चाैकशी आता महाराष्ट्र शासनाने नाही तर सीबीआयने केली पाहिजे. माझी नार्काे टेस्ट करा, जरांगेची टेस्ट करा.
हे एकदा झाले पाहिजे, सत्य पुढे आले पाहिजे. उगाच एखाद्यावर आरोप करायचे? मुख्यमंत्र्यांच्या आईबहिणीवर बोलायचे. पंकजा ताईंबद्दल काहीही बोलायचे. आम्हाला पण वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता. माझा एका फोन आहे, जो 24 तास सुरू असतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


