राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात !
ज्यांनी जमीन चोरली आहे, ते मते चोरूनच सत्तेत आले आहेत. मोदीजी गप्प आहेत आणि त्यांचे मौन बरंच काही सांगून जात आहे. कारण लुटारूंच्या पाठिंब्यावरच त्यांचं सरकार टिकलेले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महायुती सरकार आणि पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले.
पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणावरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाबद्दल एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये १८०० कोटी रुपयांची शासकीय जमीन, जी मागासवर्गीयांसाठी राखीव होती, ती फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये मंत्र्याच्या मुलाला विकण्यात आली. त्यात मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. म्हणजे एक तर लूटही केली आणि त्यावर कायदेशीर करण्यातही सूट देण्यात आली”, असे राहुल गांधी म्हणाले.
ते मते चोरून पुन्हा सत्तेत येणार -राहुल गांधी
“ही जमीन चोरी त्या सरकारने केली आहे, जे मत चोरी करून सत्तेत आले आहे. त्यांना माहिती आहे की, कितीही लुटले तर मते चोरून पुन्हा सत्तेत येता येणार आहे. ना लोकशाहीची काळजी आहे, ना जनतेची; ना मागासवर्गीयांच्या अधिकारांची”, अशी टीका राहुल गांधींनी यांनी भूखंड घोटाळ्यावर केली.
राहुल गांधींचा मोदींना सवाल
मोदीजी, तुमचं मौन बरंच काही सांगून जात आहे. जे मागासवर्गीय आणि वंचितांचे हक्क हिरावून घेत आहे, त्याच लुटारूंवर तुमचे सरकार टिकलेले आहे म्हणूनच मोदीजी तुम्ही गप्प आहात का?, असा सवाल राहुल गांधी यांनी मोदींना केला.
पुण्यातील कोरेगाव पार्क भागात तब्बल १८०० कोटी रुपये किंमत असलेला भूखंड पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. मुद्रांक शुल्क म्हणून फक्त ५०० रुपये भरले. हे सगळं कागदोपत्री समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


