ठाणे ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
ठाणे, दि. ७ (जिल्हा परिषद, ठाणे) — ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ, दर्जेदार आणि सशक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने असंसर्गजन्य आजार तपासणी व जनजागृती शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र, बदलापूर येथे यशस्वीपणे पार पडले. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या शिबिराचा उद्देश कर्करोगाचे लवकर निदान करून जीवन वाचविणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती वाढवून आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा होता. तपासणीदरम्यान मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या तीन प्रमुख प्रकारांच्या तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय डायबिटीस (मधुमेह) आणि उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी देखील करण्यात आली.
शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी केली. महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान HPV DNA टेस्ट आणि VIA टेस्टिंग द्वारे करण्यात आले. मुखरोग व स्त्रीरोग तज्ञांनी संपूर्ण आरोग्य तपासणी केली, तर फिजिशियन डॉक्टरांनी डायबिटीस व रक्तदाब तपासणी करून सल्ला दिला. एकूण ५६ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला, यामध्ये १३ पुरुष आणि ४३ महिला नागरिकांचा सहभाग होता.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीचे तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, बदलापूर येथील डॉ. प्रशांत कनोजा, डॉ. अश्विनी वाणे, आरोग्य सहाय्यिका शुभांगी नेवारे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र बोरकर तसेच प्राची बढे आणि आरोग्य सेविका माया केदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. UPHC कात्रप येथील आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील, अश्विनी बनसोड आणि इतर स्वयंसेविका उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, “कर्करोग, डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे आजार ग्रामीण भागातही वाढत आहेत. त्यामुळे नियमित तपासणी आणि आरोग्याविषयी जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी वेळेवर तपासणी करून निरोगी जीवन जगावे.”
बदलापूर गाव आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी प्रथमच कर्करोग तपासणी करून घेतली आणि आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांनी पुढील काळात अशी शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.




