क्लिप व्हायरल करण्याचा कट; जरांगेंनी पंकजा मुंडेंसह कोणकोणत्या नेत्यांची नाव घेतली ?
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी अडीच कोटींना माझ्या हत्येची सुपारी दिल्याचं जरांगे म्हणाले.
इतकंच नाहीतर यावेळी बोलताना जरांगे बोलले की, जे दोन आरोपी पकडलेत त्यातील आरोपींकडे राज्यातील अनेक नेत्यांची माहिती असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
मनोज जरांगेंचे गंभीर आरोप
राज्यातील अनेक नेत्यांच्या गाडीच्या सीटखाली मोबाईल लावून त्यांच्याविरोधात षडयंत्र केलं जातं आहे. नेत्यांची गुपीत ऐकली जातात, अनेक नेत्यांच्या घरातही छुपा कॅमेरा लावलाय नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
राज्यातील बऱ्याच ठिकाणी गाडीच्या सीटखाली मोबाईल- जरांगे
आमच्याकडे इतक्या रेकॉर्डिंग आहेत की संपत नाहीयेत. जे आरोपी आहेत त्यातील एकाकडे सगळी माहिती आहे. पंकजा ताई, चंद्रशेखर बावनकुळेंचा भाच्याचा काय विषय, राज्यातील बऱ्याच ठिकाणी गाडीच्या सीटखाली मोबाईल आहे, कोण नेता, काय बोलतो, कोणता मराठा नेता, कोणता आमदार काय बोलतो अशी यांची वृत्ती आहे. ही अशी नासकी टोळी संपली पाहिजे, याला फक्त राजकारण करायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
राजकीय नेत्यांची नावे
गाडी धुवायला गेल्यावर जीपीएस लावला जातो, घर पुसणारे असती त्याला डबल पगार द्यायचा, जो बॉडीगार्ड असेल त्याला पाचपट पगार द्यायचा हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. पंकजा ताईंचंही आहे, कराडाबद्दल, सुरेस धस, संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखबद्दलही आहे. या माणसाने जातीला डोळ्यावर आणून ठेवलं, अशांचा नायनाट होणं गरजेचं असतं. धनंजय मुंडेने मला खेटायला पाहिजे नव्हतं, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
तुमचंही काही बाहेर येऊ शकतं- जरांगे
बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित लोकांना सर्व माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी यात खोलात लक्ष खालावं कारण माझं हे प्रामाणिक मत आहे, तुमचंही काही बाहेर येऊ शकतं, असं म्हणत मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांना मुंडेंच्या चौकशीची मागणी केली आहे.
इतकं सहज गाफिल राहून हा विषय सोडू नका- जरांगे
या प्रकरणामध्ये गृहमंत्रालय, मुख्यमंत्री साहेब काय करतं बघायचंय. मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायचीय, असे राज्यकर्त्यांना आणि आणि राज्याला घातक आहेत. इतकं सहज गाफिल राहून हा विषय सोडू नका. याच्या मुळात जा आणि शेवट करा, असं जरांगेंनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या बैठका झाल्या- जरांगे
मी सांगितलेलं खोटं वाटत असेल तर माणूस पाठवा मी रेकॉर्डिंग ऐकवतो. असला राज्याचा नास करणाऱ्याचा शेवट करा आणि चौकशीला घेऊन याची चौकशी करा. आरोपीसोबत धनंजय मुंडे यांच्या बैठका झाल्या आहेत. सामूहिक कट रचला असून त्याला चौकशीला घ्या, असं जरांगे म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार
दरम्यान, मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपवर धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


