ठाणे ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
ठाणे, दि. ७ (जिल्हा परिषद, ठाणे) — ठाणे जिल्ह्यातील पोषण स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच कुपोषण निर्मूलनासाठी कार्यक्षम धोरणे आखण्यासाठी “जिल्हा पोषण अभिसरण समिती” व “कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स” यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात दि. ०६ नोव्हेंबर, २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास विभाग) संजय बागुल, संतोष भोसले, नोडल अधिकारी (ठाणे नागरी), सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी व ग्रामीण), जिल्हा परिषद ठाणे, विविध महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, तसेच आर.बी.एच.के. (RBHK) प्रतिनिधी आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील सध्याच्या पोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील ३,५६१ अंगणवाडी केंद्रांमार्फत १०० टक्के पूरक पोषण आहार नियमितपणे वाटप केला जात असल्याचे समाधानकारक चित्र बैठकीत मांडण्यात आले. या उपक्रमामुळे मागील वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण घटले असल्याचे अहवालांद्वारे स्पष्ट झाले.
या यशस्वी प्रयत्नांनंतरही पोषण व्यवस्थेच्या शाश्वत परिणामासाठी अंगणवाडी सेविकांच्या क्षमता विकासासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी यांनी अधोरेखित केले.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बालकांच्या पोषणाशी संबंधित VCDC (Village Child Development Committee) आणि CTC (Child Treatment Centre) यांच्या कार्यक्षम अंमलबजावणीवर भर देण्यात आला. बालकांच्या गृहभेटींचे प्रमाण वाढविणे, वजन व उंची मोजणीचे नोंदीकरण वेळेवर पूर्ण करणे, आहार वितरण आणि पूरक आहाराचे प्रभावी नियोजन करणे, CTC केंद्रांसाठी पूरक बुडीत मजुरीची तरतूद करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर “अंगणवाडी सक्षमीकरण टीम” स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. या टीममध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, CDPO, NGO प्रतिनिधी, तसेच UNICEF यांचा समावेश राहणार असून, अंगणवाडी केंद्रांच्या प्रशिक्षण, देखरेख आणि सेवा गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा साधली जाणार आहे.
“ठाणे जिल्ह्यातील बालकांचे आणि मातांचे पोषण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पूरक पोषण आहाराची शंभर टक्के अंमलबजावणी ही आनंददायी बाब असली, तरी आता आपले लक्ष गुणवत्तेच्या वृद्धीकडे आणि सेवांच्या सक्षमीकरणाकडे असले पाहिजे. अंगणवाडी सेविका आणि प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक स्तरावर सक्रिय सहभाग घेतल्यास ‘कुपोषणमुक्त ठाणे’ हे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल.” – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
बैठकीचा समारोप करताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून आगामी काळात पोषण अभियान अधिक प्रभावी करण्याचे आश्वासन दिले.



