नेमकं काय घडलं…
कल्याण डोंबिवली महापालिकेपासून वेगळे करून २७ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याच्या मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि भाजपाचे आमदार किसन कथोरे या दोघांनीही रस्त्यावर उतरून रास्ता रोको केल्याने या आंदोलनाला नवे राजकीय वजन मिळाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांना वेगळे करून स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना या गावांची प्रभाग रचना येत्या पालिका निवडणुकीत करण्यात आलेली आहे. याला 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने विरोध केला आहे. मनसे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी याला पाठिंबा दिला आहे.
अखेर संघर्ष समितीने पुढचे पाऊल म्हणून शुक्रवारी रास्ता रोकोचे हत्यार उपसले. भाजपा आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे आणि भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने कल्याण-शीळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. मानपाडा सर्कल येथे जवळपास दोन तास ठिय्या देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
27 गावांची अनेक वर्षांपासूनची मागणी, पण निर्णय होत नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दवाढीनंतर ग्रामीण भागातील या 27 गावांवर कर आकारणी, नकाशा मान्यता, परवानग्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न कायम आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार महापालिका विकासकामे करण्यात असमर्थ असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. याच पार्श्वभूमीवर गावांचे नगरपालिका स्वरूपात पुनर्गठन करण्याची मागणी गेली काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र निर्णयाचा ठोस परिणाम आजपर्यंत दिसून आला नाही.
खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले, “27 गावांचा विकास थांबलेला आहे. निर्णय झाला नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. सर्व पक्ष आता एकत्र आहेत. हे आंदोलन मागे हटणार नाही. तर, आमदार किसन कोथेरे म्हणाले, “हा राजकीय नाही, तर लोकांच्या विकासाचा प्रश्न आहे. आम्ही हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे आणि अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
आक्रमक भूमिका घेणार…
आंदोलनात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील प्रतिनिधी एकत्र दिसले. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मागणीला राजकीय गती मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपचा सक्रिय पाठींबा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारा पुढाकार यामुळे आगामी काळात या मागणीसाठी अधिक आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.


