चिडलेले तालिबान म्हणतेय; आता तुम्हाला तोडणार…
ड्युरंड सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे अफगाणिस्तानमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यानंतर अफगाणी नागरिकांनी आणि तालिबान सैनिकांनी पाकिस्तानचे तुकडे करण्याची आणि त्यांच्यावर जोरदार पलटवार करण्याची धमकी दिली आहे.
सीमावर्ती भागात पुन्हा एकदा भीषण संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) च्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानने अनेकदा अफगाण हद्दीत हवाई हल्ले आणि गोळीबार केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारानंतर, अफगाणी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक अफगाण नागरिक थेट पाकिस्तानला दोन भागांत विभाजित करण्याची धमकी देत आहेत. “आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन सहन केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
तालिबानची भूमिका
तालिबानच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयानेही पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम आणि शांतता चर्चा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असताना, सीमावर्ती भागातील या नवीन संघर्षांमुळे शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. दोन्ही देशांमधील हा वाढता तणाव दक्षिण आशियातील अस्थिरता वाढवू शकतो.


