नुकत्याच वयात आलेल्या 14 ते 16 वर्षांच्या मुलींना फसवून त्यांची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारी संघटित गुन्हेगारांची यंत्रणा बिनबोभाटपणे कार्यरत आहे. पूर्वी मुलींची विक्री करण्याचे केंद्र हे मुंबई होते.
संपूर्ण देशातून व परदेशातूनही मुलींना आणून त्याठिकाणी विक्री केली जायची. मात्र, काही वर्षांपासून ह्यूमन ट्रॅफिकिंगचे केंद्र आता ‘गोवा’ बनले आहे. संपूर्ण देशातून या ठिकाणी मुलींचा पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 30 टक्के मुली या महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. गोव्यात ह्यूमन ट्रॅफिकिंगविरोधात काम करणार्या ‘अर्ज’ या संस्थेने रॅकेटमध्ये अडकलेल्या काही मुलींची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. याबाबत त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ह्यूमन ट्रॅफिकिंगचे हे रॅकेट कसे चालते, याचा घेतलेला हा आढावा…
भारतात वेश्या व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात देवदासी प्रथेच्या नावाखाली मुलींना देवीला वा देवाला सोडले जायचे. त्यानंतर तिची रवानगी सांगली, मिरज, कोल्हापूर वा मुंबई या ठिकाणच्या वेश्यालयात केली जात होती. या मुलींच्या व्यवसायावर जगणारी संघटित गुन्हेगारांची यंत्रणा काम करीत होती. कर्नाटकातून तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून मुलींची खरेदी करून त्यांना मुंबईसारख्या भागात विकले जायचे. यासाठी ह्यूमन ट्रॅफिकिंगची स्वतंत्र यंत्रणा काम करीत होती. यामध्ये राज्यकर्त्यांपासून पोलिस यंत्रणा गुन्हेगारांना मदत करीत होती. त्यामुळे वर्षानुवर्षे बिनबोभाटपणे वेश्या व्यवसाय चालत आहे. याला अटकाव करण्यासाठी काही संघटनांनी पुढाकार घेतला. त्यानंतर सरकारने ठोस पावले उचलून कायदा केला. त्यामुळे ह्यूमन ट्रॅफिकिंगला काही प्रमाणात आळा बसला आहे.
ऑनलाईनमुळे वाढले ह्यूमन ट्रॅफिकिंग
देवदासी, प्रेमातून फसवणूक झालेल्या, नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या मुलींची वेश्या व्यवसायासाठी विक्री केली जात होती. त्यासाठी ह्यूमन ट्रॅफिकिंग करणार्यांना स्वत: फिल्डवर जाऊन मुलींना फसवावे लागत होते. त्यामध्ये पोलिसांची भीती होती. मात्र, गेल्या 20 वर्षांत इंटरनेटमुळे सर्व गोष्टी आता ऑनलाईन झालेल्या आहेत. अल्पवयीन मुलीही सोशल मीडिया हाताळत असल्याने आता हे ह्यूमन ट्रॅफिकर या मुलींना सावज बनवत आहेत. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. त्यानंतर त्यांची वेश्या व्यवसायासाठी विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅफिकरची यंत्रणा
भारतातील 25 राज्यांतून मुलींची फसवणूक करून त्यांची गोव्याला विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातून 30 टक्के विक्री होत असल्याचे समोर आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ह्यूमन ट्रॅफिकरची यंत्रणा कार्यरत आहे. दररोज मुलींची फसवणूक करून त्यांना गोव्याला पाठवले जाते आणि हे सर्व ऑनलाईन चालत आहे. यामध्ये प्रत्यक्ष ट्रॅफिकरचा चेहराही पाहिलेला नसतो. केवळ ऑनलाईन ओळखीवर मुलींना आमिष दाखवून त्यांची जोरात विक्री सुरू आहे. गोव्यात ‘अर्ज’ संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अरुण पांडे व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी ह्यूमन ट्रॅफिकिंगविरोधात अनेक वर्षांपासून लढा सुरू ठेवला आहे. त्याला काही प्रमाणात यश मिळत आहे. (क्रमशः)
अनोळखी व्यक्तीचा फोन उचलला अन् जाळ्यात अडकली
लग्न झालेली 25 वर्षांची मुलगी. पती दारूडा… पदरी तीन लहान मुले… सतत मारझोड… कंटाळून ती माहेरी निघून आली… शेतात काम करू लागली… एके दिवशी तिच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो… तो तिची माहिती विचारू लागतो… शेवटी तो सॉरी, राँग नंबर म्हणून फोन ठेवतो… पुन्हा काही दिवसांनी त्याच व्यक्तीचा फोन येतो. पुन्हा तो बोलू लागतो. बोलता बोलता ती आपल्या समस्या सांगू लागते. तो तिच्या मोबाईलवर दोन हजार रुपये पाठवून देतो. मुंबईला नोकरी देण्याचे आमिष दाखवतो. ट्रेनचे तिकीट पाठवतो. ती गाडीत बसते. पण ती ट्रेन असते गोव्याची. त्या ठिकाणी उतरल्यानंतर ती ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या जाळ्यात अडकलेली असते. तिची विक्री झालेली असते.
2019 ते 2024 दरम्यान गोव्यातून रेस्क्यू केलेल्या मुलींची संख्या
महाराष्ट्र : 50, पश्चिम बंगाल : 20, उत्तर प्रदेश : 15, दिल्ली : 15, छत्तीसगड : 6, पंजाब : 6, मध्य प्रदेश : 5, गोवा : 4, गुजरात : 3, आसाम : 2, बिहार : 2, नागालँड : 2, हरियाणा : 1, कर्नाटक : 1, केरळा : 1, ओडिशा : 1, पाँडिचेरी : 1, राजस्थान : 1, तेलंगणा : 1, उत्तराखंड : 1.
गोव्यातून रेस्क्यू केलेल्या महाराष्ट्रातील मुलींची संख्या
मुंबई : 14, ठाणे : 9, मुंबई उपनगर : 8, नागपूर : 5, पालघर : 5, पुणे : 3, बीड : 2, गडचिरोली : 1, नंदूरबार : 1, रायगड : 1, सांगली : 1.


