दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
ठाणे (बदलापूर): वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धिविनायक आर्केड वार्ड क्रमांक ३ या सोसायटीतील रहिवाशांनी गेली अनेक वर्षे गटार व रस्त्याच्या मूलभूत सुविधांसाठी मागणी केली असली, तरी त्यांची दखल कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे या रहिवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दारात न्यायासाठी धाव घेतली.
मनसेचे विभागाध्यक्ष कु. जयेश केवणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या वेळी रहिवाशांनी सांगितले की —
“मागील दहा वर्षांपासून गटाराची मागणी केली तरी ग्रामपंचायतीकडून केवळ आश्वासन दिले गेले. माजी शिवसेना व सध्याचे भाजप सरपंच सदस्यांनी सुद्धा कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही.”
सिद्धिविनायक आर्केड, निखिल गॅलेक्सी व राजाराम अपार्टमेंट या परिसरात सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे दूषित पाणी रस्त्यावर वाहत येते, ज्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर सिद्धिविनायक आर्केडच्या ग्राउंड फ्लोअरवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये हे दूषित पाणी मिसळत असून पिण्याचे पाणीही प्रदूषित होत आहे.
या गंभीर परिस्थितीची माहिती ग्रामपंचायत, सरपंच व स्थानिक सदस्यांना वारंवार देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासने देणारे सर्व पक्षीय नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत.
या पार्श्वभूमीवर मनसे विभागाध्यक्ष कु. जयेश केवणे यांनी रहिवाशांसोबत चर्चा करून तातडीने गटार व रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे केली आहे.
तसेच १५ दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास वांगणी ग्रामपंचायत, पंचायत समिती अंबरनाथ व जिल्हा परिषद ठाणे यांच्या दालनात मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
“मनसे एखादं काम हातात घेतं तेव्हा निकाल मिळाल्याशिवाय थांबत नाही,”
असं मत व्यक्त करत कु. जयेश केवणे, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, वांगणीयांनी सिद्धिविनायक आर्केडच्या रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचं ठाम आश्वासन दिले




