उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यांच्या कंपनीकडून वतनी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात होता.
मात्र हे कथित प्रकरण समोर आल्यानंतर हा करार रद्द करण्यात आला. आता या प्रकरणी चौकशी चालू आहे. दरम्यान, पवार कुटुंबातील हे जमीन खरेदी प्रकरण ताजे असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समोर येत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. पवार कुटुंबातीलच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामती तालुक्यातील 100 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, असा मोठा दावा हाके यांनी केला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात बारामती तालुक्यात जाऊन मी आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
सुप्रिया सुळेंकडून 100 एकर जमीन…
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ‘अजित पवार यांनी अख्खी बारामती लुबाडली आहे. गोजुबावी म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये 100 एकर जमीन आहे. ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून चालू आहे. ही वतनी जमीन आहे,’ असा धक्कादायक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच बारामती तालुक्यात ही जमीन आहे. आगामी दोन-चार दिवसांत मी तिथे जाणार आहे. गोजुबावी या गावात जाऊन मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिलीय.
पार्थ पवार यांच्या कर्तृत्त्वावर किती वेळा
याआधी ऑफिस प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून अनेक नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. अजित पवार यांच्या जमीन प्रकरणावर पडदा टाकला जाणार आहे. महाराष्ट्रात तीन दिवसांपासून हे वातावरण सुरू आहे. अजित पवार हे पार्थ पवार यांच्या कर्तृत्त्वावर किती वेळा पांघरून घालणार आहेत. पार्थ पवार यांच्याविरोधात आम्ही उपोषण आणि धरणे आंदोलन चालू करू, असा इशाराच लक्ष्मण हाके यांनी दिला.


