पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की…
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर आज एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून घटनेचा तपास केला जात आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळातून मृतांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, ‘आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसंच, जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.
दरम्यान पुढे शरद पवारांनी घडलेल्या घटनेबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. जुन्या दिल्लीतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी ही स्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही घटना चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले ‘लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
मोदींची प्रतिक्रिया
या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच आपण सर्व परिस्थितीचा आढावा घेत असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.
“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेची प्राथमिक माहिती दिली. सतीश गोलचा यांनी सांगितले की, आज सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ल्याजवळून संथ गतीने जाणाऱ्या वाहनात स्फोट झाला. वाहनात त्यावेळी काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए, एनएसजी आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी आल्या. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलवर आय २० ह्युंदाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या गाड्या आणि रस्त्यावरून जाणारे लोक जखमी झाल्याची महिती आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच १० मिनिटांत दिल्ली गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली आहेत. एनएसजी आणि एनआयएच्या पथकाने एफएसएलबरोबर सखोल चौकशी सुरू केली आहे.
जवळपासच्या सर्व ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरा आणि बाकी सर्व गोष्टींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माझे सीपी दिल्ली आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी यांच्याशी बोलणे झाले आहे आणि हे दोघे घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन याची सखोल चौकशी होईल. चौकशीतून जे समोर येईल ते लोकांसमोर ठेवले जाईल. मी थोड्याच वेळात घटनास्थळावर जात आहे आणि रुग्णालयात देखील जाईन, असे अमित शाह म्हणाले आहेत.


