दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या कार स्फोटाचा तपास आता अधिक वेगवान झाला आहे. ज्या कारमध्ये स्फोटा झाला ती i20 Hyundai कार ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदणी होती त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचं नावही समोर आलं आहे.
ही कार हरियाणातील मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू आहे.
कारचा मालक पोलिसांच्या ताब्यात
तथापि, प्राथमिक चौकशीदरम्यान मोहम्मद सलमानने पोलिसांना सांगितले की, त्याने ही कार दुसऱ्याला विकली होती. पोलीस पथकं आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (RTO) संपर्क साधून कारच्या खऱ्या मालकाचा शोध घेत आहेत.
स्फोटाच्या वेळी कार कोणाच्या ताब्यात होती आणि तिचा खरा मालक हे निश्चित करण्यासाठी कारच्या विक्री आणि हस्तांतरणाच्या तपशीलांना RTO रेकॉर्डशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्फोटामागील कट उलगडण्यासाठी आणि खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस कारच्या सध्याच्या मालकाची अचूक ओळख पटवण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत.
10 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ येताच सायंकाळी 6.52 वाजता कारमध्ये भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 24 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचेही समजतं आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागात स्फोट झाला तो भाग बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात वर्दळीचा असतो. लाल किल्ला मेट्रो स्टेशन 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 साली बांधण्यात आले होते आणि तेव्हापासून स्टेशनवर ऑटो-रिक्षा, ई-रिक्षा आणि कार पार्क केल्या जात आहेत. लोक स्टेशनमधून बाहेर पडताना चांदणी चौक किंवा चावडी बाजारात जाण्यासाठी या ई-रिक्षा आणि ऑटो-रिक्षांचा वापर करतात. मेट्रो स्टेशनजवळील स्फोट हा एक मोठी घटना असल्याने गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
तपासाची दिशा
एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये स्फोटापूर्वी एक पांढऱ्या रंगाची इको व्हॅन दिसत आहे. पथक वाहनाच्या नोंदणी तपशीलांचा आणि हालचालींचा मागोवा घेत आहे. स्फोटात वापरल्या गेलेल्या स्फोटकांच्या रासायनिक अहवालासाठी नमुने सीएफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. दिल्ली आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागात संशयास्पद वाहनांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
संपूर्ण कारवाई गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली
गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री उशिरा एनआयए, आयबी आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये संपर्काचे प्रयत्न तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले. कोणत्याही संशयितांना त्वरित अटक करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि डार्कनेट प्लॅटफॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.


