बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ; हाती घड्याळ बांधणार…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी राजकीय मैदानात उतरून कंबर कसली आहे. अशातच बीडमधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राजकीय उलटे वारे वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण एकीकडे भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना, बीडमध्ये मात्र आउटगोइंग सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पक्षाची साथ सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार भीमराव धोंडे शक्ती प्रदर्शन करत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान असलेल्या भीमराव धोंडे यांच्या प्रवेशामुळे आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांचे डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
उद्या मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी भीमराव धोंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेची तोफ डागली. विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याचं त्यांनी म्हटलं. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत.. पंकजाताई सोबत काम करणं हे माझं वय नाही, मात्र स्थानिक आमदाराच्या विरोधामुळेच मी पक्ष सोडत आहे’, असे भीमराव धोंडे म्हणाले. दरम्यान, भीमराव धोंडे यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.


