शिंदे सेना-राष्ट्रवादी’चा फॉर्म्युला ठरला; भाजपचा ‘सस्पेंस’ कायम…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे सूर जुळताना दिसत नाही. राज्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीने आपआपसात निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
यवतमाळ नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती निश्चित झाली आहे. सेना 32 तर राष्ट्रवादी 26 जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपने अद्याप होकार दिला नसल्याने महायुतीबाबत संभ्रम कायम आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ पालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी राजकीय पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढतीचे चित्र सुरुवातीला होते. मात्र, जागावाटपावरून महायुतीत ओढताण सुरू आहे. यामुळे यवतमाळ पालिकेसाठी शिवसेना शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. दोन्ही पक्षात जागावाटपावरून वाटाघाटी पूर्ण झाली आहे.
जागावाटपासह उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. भाजपच्या ताब्यात असलेली ही पालिका आपल्याच हातात राहावी यासाठी भाजपही मोर्चेबांधणी करीत आहे. यासाठी महायुतीच्या प्रस्तावाला अद्याप भाजपने नकार दिला नसला तरी होकारही दिलेला नाही. यामुळे महायुतीबाबत संभ्रम आहे. महायुती तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत नागपूर येथे पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. काही पदाधिकारी महायुतीच्या बाजूने आहे. यामुळे महायुतीचा निर्णय नागपुरातून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अॅड. प्रियदर्शनी उईके यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यावरच अंतिम चर्चा करण्यासाठी नागपूर येथे बैठक होणार असून मंगळवार (ता.११) पर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यवतमाळ पालिकेच्या माजी आरोग्य सभापती अरुणा गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश घेतला आहे.


