7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू; काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा !
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी(दि.11) संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
7 महिन्यांत 41 भारतीयांचा मृत्यू; जबाबदार कोण?
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की, गेल्या 7 महिन्यांत 41 भारतीयांचा दहशतवादी हल्ल्यांत मृत्यू झाला आहे. लाल किल्ल्याजवळचा स्फोट ही त्या साखळीतील आणखी एक शोकांतिका आहे. यासाठी जबाबदार कोण आहे? दिल्लीमध्ये 10 लोकांचे प्राण गेले आणि कालच फरीदाबादमध्ये 360 किलो स्फोटक पकडले गेले. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक राजधानीच्या जवळ कसे आले? ही गंभीर सुरक्षा चूक नाही का?
अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत. दिल्ली पोलिस कोणाच्या अखत्यारीत येतात? देशाच्या सीमांची जबाबदारी कोणावर आहे? IB कोणाला रिपोर्ट करते? या सगळ्यांची जबाबदारी शेवटी गृहमंत्र्यांवरच येते. भारतीयांच्या आपल्याच देशात हत्या होत आहेत आणि मोदी-शाहांना केवळ निवडणुकीच्या भाषणांसाठी वेळ आहे. देश सुरक्षित नाही. सरकारही उत्तर देण्यापासून पळ काढत आहे, अशी टीका त्यांनी केली.
18 तास झाले, पण गृहमंत्री मौन
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. 18 तास झाले आहेत, पण गृहमंत्र्यांनी अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा आणि वेगवेगळ्या गोष्टी पसरत आहेत. जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधानांनी सौदीचा दौरा रद्द करुन भारतात परतले होते. पण आता दिल्ली ब्लास्टनंतर ते भूटानच्या दौर्यावर गेले आहेत. देश संकटात असताना पंतप्रधान परदेशात का गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


