बिहारला आता ट्रिपल आर – रिझल्ट (निकाल), रिस्पेक्ट (आदर) आणि राईज (उदय) याची गरज आहे. मतदानाच्या आताच्या टप्प्यात बिहारी जनता विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर निर्णय घेईल, असे प्रतिपादन राजद नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
बिहारमधील मतदानाचा दुसरा टप्पा सुरु असताना यादव यांचे हे विधान प्रसिद्ध झाले आहे.
तेजस्वी यादव यांनी पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानाचा उल्लेख करत मतदारांचे आभार मानले. बिहारच्या जनतेने हे स्पष्ट केले आहे की केवळ भाषणे, आश्वासने आणि घोषणा आता पुरेशा राहणार नाहीत. जनतेला बदल हवा आहे आणि हा बदल केवळ सत्ता परिवर्तनातच नव्हे तर विचार आणि धोरणांमध्येही प्रतिबिंबित झाला पाहिजे. मतदानाच्या पहिल्या टप्प्याने असे वातावरण निर्माण केले आहे की, राज्य आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. नवीन पिढी स्वप्न पाहत आहे आणि जुनी पिढी ती स्वप्ने सत्यात उतरताना पाहू इच्छिते.
तेजस्वी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि म्हटले की, भाजप-जेडीयू युतीने वारंवार जनतेचे वास्तविक मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. बंदुका, बॉम्ब, जात आणि धमकी या राजकारणाद्वारे जनतेला दिशाभूल करण्याची रणनीती अवलंबण्यात आली. परंतु यावेळी हा प्रयत्न अयशस्वी झाला. जनतेने सुज्ञपणे आणि संघटित पद्धतीने मतदान केले. यावरून असे दिसून येते की बिहार आता विचार करत आहे आणि मुद्द्यांवर आधारित मतदान करत आहे.
तेजस्वी म्हणाले की, गेल्या २० वर्षात बिहारला आवश्यक असलेला विकास झालेला नाही. त्यांनी रोजगाराचा अभाव, गुन्हेगारी, कमकुवत शिक्षण व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यासारख्या समस्या गंभीर असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य कुटुंबे महागाई आणि आर्थिक दबावाशी झुंजत आहेत.
17 महिन्यांच्या सरकारचा उल्लेख
तेजस्वी म्हणाले की, महाआघाडी सरकार १७ महिने सत्तेत असताना, तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब कुटुंबांना थेट फायदा देणारी धोरणे आखण्यात आली. आम्ही सरकारी नोकरी प्रक्रिया पारदर्शक केली, योजना तळागाळात नेल्या आणि रोजगाराभिमुख धोरणे सुरू केली. यावरून हे सिद्ध होते की महाआघाडीची धोरणे केवळ घोषणा नव्हत्या, तर अंमलात आणल्यावर खरा बदल घडवून आणण्यास सक्षम होती. खरे स्वातंत्र्य बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई आणि असमानतेपासून मुक्ततेत आहे. बिहार तेव्हाच मजबूत होईल जेव्हा गावे मजबूत असतील.


