दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान !
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांनी सरकारवर थेट निशाणा साधत इंटेलिजन्स फेल्युअर असल्याचा आरोप केला आहे.
तसेच, दोषींना सहा महिन्यांत फाशी द्या, पण निर्दोषांवर अन्याय होऊ देऊ नका, असेही म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले, दिल्ली काही छोटे गाव नाही, ती देशाची राजधानी आहे. लाल किल्ल्यासमोर असा स्फोट होणे, ही मोठी सुरक्षा चूक आणि पूर्णपणे इंटेलिजन्सचे अपयश आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या सर्व कुटुंबांबद्दल मला अतिशय सहानुभूती आहे. पण सरकारने आता कठोर पावले उचलायला हवीत आणि सहा महिन्यांत दोषींना फाशी द्यावी, पण निर्दोष लोकांना फसवून शिक्षा देणे थांबवले पाहिजे.
मुंबई ट्रेन ब्लास्टप्रमाणे निर्दोषांना शिक्षा देऊ नका
आझमी जुन्या घटनांचा संदर्भ देत म्हणाले की, मुंबई ट्रेन ब्लास्टमध्ये 187 लोकांचा मृत्यू झाला, पण आजही न्याय मिळालेला नाही. निर्दोष लोकांना पकडून 19 वर्षे तुरुंगात ठेवले, अखेर हायकोर्टने त्यांची सुटका केली. देशात अशी अन्यायाची पद्धत थांबली पाहिजे. अपयश झाकण्यासाठी निष्पापांना तुरुंगात डांबणे योग्य नाही. मलाही मुंबई बमस्फोट प्रकरणात अटक झाली होती. मी एक वर्ष तुरुंगात होतो. माझे नशीब चांगले की, माझ्याकडे पैसे होते, कुटुंबाने मेहनत घेतली, सुप्रीम कोर्टात गेले, देशातील मोठे वकील लावले आणि मी निर्दोष सुटलो.
फरीदाबाद मॉड्यूलवर प्रतिक्रिया
फरीदाबाद मॉड्यूल (ज्यात काही सुशिक्षित लोकांच्या दहशतवादातील सहभागाचा आरोप आहे) या प्रकरणावर आझमींनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, हे अत्यंत दुर्दैवी आहे की, आज शिक्षित लोकही दहशतवादात गुंतलेले आढळत आहेत. पण हे लक्षात घ्यायला हवे की, अन्यायातून दहशतवाद जन्म घेतो. अन्याय संपला, तर दहशतवादही संपेल. मी निवडणुकीशी थेट संबंध जोडू इच्छित नाही, पण चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या आधी अशा घटना का घडतात, हे शोधणे सरकारचं कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.


